घरका भेदी लंका ढाय!

भाजपची स्थिती अशी होणार का : इच्छुकांची यादी वाढली

पुणे – “कारभारी बदला’ असा नारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला आणि कॉंग्रेसचा चेहरा खरेच लोकांनी पाडला. राष्ट्रवादीला संपूर्ण सत्ता नव्हे परंतु सत्तेची किल्ली मतदारांनी हातात दिली. त्यानंतर मोदी लाट आली आणि भाजपेयींची चांदी झाली. आठ आमदार, दोन खासदारच नव्हे तर महापालिकेतही पूर्ण सत्ता मिळवून दिली. शहरात भाजपमय वातावरणच तयार झाले. मात्र, गेल्या चार वर्षांत पक्षाने केलेली कामगिरी पाहाता “घरका भेदी लंका ढाय’ अशी त्यांची परिस्थिती आगामी निवडणुकांमध्ये होणार का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्येही भाजपच्या हातून गेलेली सीट ही कशामुळे गेली, हे माहीत आहेच; त्यावेळी ते स्पष्टही झाले होते. परंतु 2014 ला लोकसभेची सीट भाजपने काबीज केली तीही मोदी लाटेमुळे, परंतु आता केवळ “सीट’ किंवा “मोदी’ हा विषय राहिला नसून, “महत्त्वाकांक्षा’ हा विषय प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांची यादी वाढली असून, आपल्यालाच तिकिट कसे मिळेल याची स्पर्धा पक्षांत सुरू झाली आहे.

जुन्यांना घरी बसवा आणि अन्य कार्यकर्त्यांना संधी द्या, ज्यांनी आजपर्यंत सत्ता उपभोगली त्यांच्याकडून घराणेशाही येण्यापेक्षा 25-30 वर्षांपेक्षा जास्त काळ पक्षाचे निष्ठावान आहेत त्यांना संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली जात आहे.

लोकसभा आणि विधानसभेचे गेल्या सहा महिन्यांपासून वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांनी पोस्टरबाजीपासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथेच कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. जनसंपर्क, चाचपणी, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती, असे प्रकार इच्छुकांनी सुरू केले आहेत.

लोकसभेच्या गाजराची पुंगी वाजली नाही तर यातील काहींनी विधानसभाही डोळ्यापुढे ठेवली आहे. विधानसभेतील इच्छुकांची संख्या जागांप्रमाणेच जास्त असल्याने त्यातील गणिते आणखी वेगळी राहणार आहेत. लोकसभेच्या जागेच्या राजकारणावर विधानसभेतील उमेदवारांची “मदत’ अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत दिलेली “कारभारी बदला’ची हाक पक्षश्रेष्ठींपर्यंत कशी पोहोचते आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे लवकरच समजेल. परंतु त्या आधी पक्षांतर्गत भेदी लोकसभेची लंका तारून नेतो कि उद्‌ध्वस्त करतो हे पाहणेही तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.

चार चेहरे पक्षश्रेष्ठींसमोर तिकिटासाठी उभे
आधी नगरसेवक म्हणून, त्यानंतर चारवेळा विधानसभेवर निवडून गेल्यामुळे आणि मंत्रीपदी असल्यामुळे लोकसभेच्या जागेवर गिरीश बापट यांनी दावा केला आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा तर या पदावर दावा राहणार हे साहजिकच आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते. राज्यसभेचे विद्यमान खासदार संजय काकडे यांनी तर आधीपासूनच उघडपणे मोर्चेबांधणी, गाठीभेटी सुरू केल्या आहेत. राज्यसभा नव्हे तर लोकसभेला लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे हे चार चेहरे पक्षश्रेष्ठींसमोर तिकिटासाठी उभे राहिले आहेत.

राष्ट्रवादीचा लोकसभेच्या जागेवर हक्‍क
कॉंग्रेसला पुण्यात लोकसभा लढण्यासाठी चेहरा नाही, असा दावा करत राष्ट्रवादीने लोकसभेच्या जागेवर हक्‍क सांगितला आहे. परंतु त्यांच्याकडेही संपूर्ण शहरातील मतदारांवर प्रभाव टाकू शकेल, असा सध्यातरी प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे भाजपला अजूनही मोदी लाटच तारणार अशा आशेवर इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)