घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हालचाली गतीमान

वाघोलीत ग्रामस्थांचा तीव्र विरोध; महावितरणकडे विद्युत पुरवठ्याची मागणी

वाघोली – पुणे महापालिकेकडून घनकचरा विभागामार्फत सरकारी खाणीच्या जागेवर (गट नं. 192/2 ) बांधकाम करून घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या हालचालीना वेग आला आहे. महावितरण कंपनीकडून 225 किलो वॅट विद्युत भाराची मागणीही करण्यात आली आहे. महापालिकेकडून स्थानिक संस्थेला विश्‍वासात न घेता महत्त्वाच्या जागा विविध प्रकल्पांसाठी घेत असल्यामुळे स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.

-Ads-

वाघोली (ता. हवेली) येथील खाण व्यवसाय कमी झाल्यामुळे या खाणीची जागा सरकारी असल्यामुळे कचरा डेपोला द्यावी, अशी मागणी 2014 रोजी महापालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वाघोली ग्रामपंचायतीला याबाबत जागेचा ठराव घेवून पाठवावा, असे पत्र दिले होते. ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली होती. ग्रामसभेमध्ये स्थानिक या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला होता. तरीही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जागेला मंजुरी दिली होती. दरम्यान, वाघोली ग्रामपंचायतने तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये कचराडेपोला कडाडून विरोध दर्शवित उपोषण, रास्तारोकोचे आक्रमक हत्यार उपसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या प्रकरणाला काही महिने पूर्णविराम मिळाला होता. परंतु अचानक महापालिकेने पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन झाल्यानंतर राडारोडा आणि निर्माल्य मध्यरात्रीच्यावेळी भावडी रस्त्यावरील खाणीत आणून टाकला. त्यामुळे पुन्हा एकदा कचरा आंदोलन पेटले होते.

वाघोली येथील भावडी रस्त्यावरील (गट नं. 129/2) दोन एकर जागेची मागणी महापालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरीही दिली होती. याबाबत महापालिकेने ग्रामपंचायतीकडून अभिप्रायही मागविला होता. ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामसभेचा विरोधाचा तसा ठरावही महापालिकेला पाठविला होता. त्यांनतर काही वर्षे महापालिकेकडून स्थगिती मिळाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, अचानक पुन्हा एकदा महापालिकेकडून स्थानिक संस्थेला विश्‍वासात न घेता वाघोली येथे घनकचरा प्रकल्पासाठी लागणारा आवश्‍यक विद्युतपुरवठा जोडणीची मागणी महावितरणकडे करून जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे घनकचरा प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेने घनकचरा प्रकल्पाबाबत आवश्‍यक विद्युत पुरवठ्याची मागणी केली आहे का, अशी विचारणा केली असता उपकार्यकारी (अभियंता हडपसर) अमित भरते यांनी याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगून संबंधित विभागालाच विचारा, असा सल्ला दिला. खरे तर वाघोली येथील सहायक अभियंता विद्युत कार्यालयाला महापालिकेने विद्युत जोडणीची मागणी केलेले पत्र प्राप्त झाले असताना वरिष्ठांना या पत्राबाबत काहीच माहित नसावे, ही बाब संशयकल्लोळ निर्माण करणारी ठरत आहे. पत्राची लपवालपवी करण्यामागे वरिष्ठांचा काय उद्देश आहे, याचे कोडे उगलडले नाही.

वाघोली गावाला कोणतीही सुविधा न देता गावातील महत्वाच्या जागा बीआरटी, राडारोडासाठी घेत आहे. स्थानिक संस्थेला विश्‍वासात घेऊन महापालिकेने काम करावे; अन्यथा आमचा याला तीव्र विरोध आहे.
– कल्पेश जाचक, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान, वाघोली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)