घटनात्मक वैध आरक्षण तातडीने द्या

मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे – मराठा समाजाला घटनात्मक वैध आरक्षण मिळण्यासाठी सर्व बाजूने आवश्‍यक कार्यवाही करावी या आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य मागासवर्गीय आयोगाने लवकरात लवकरात आपला अहवाल द्यावा. यासाठी शासनासाठी त्यांना आवश्‍यक ती सर्व साधनसामग्री तातडीने द्यावी. राजर्षि शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन द्यावी.

मराठा-कुणबी ओबीसी जात प्रमाणपत्र योजनेतील प्रक्रिया सुटसुटीत करावी. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकाससंस्थेच्या (सारथी)माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावीत. त्यासाठी निधी द्यावा. ईएसबीसी प्रवर्गातील यापूर्वी नोकरीत लागलेल्या उमेदवारांना शासकीय सेवेत कायम नोकरीत घ्यावे.

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदीचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा, मराठा, इतर मागास खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांचेवर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा, मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाची तसेच इतर महामानवाची बदनामी थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाने या मागण्याची दखल घेऊन त्या त्वरित सोडवाव्यात. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा शांततेच्या मार्गाने सुरूच राहणार आहे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)