घटनाचक्र 2017 समाजकारण: उत्तर प्रदेशात भाजपाचा करिष्मा

सपमधली वादावादी संपेनाच…

उत्तरप्रदेशमध्ये यंदा मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या पितापुत्रांमधील राजकीय सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली. समाजवादी पार्टी संपवण्याचा डाव अखिलेश रचत असल्याचा ठपका ठेवत आपल्या पुत्राची मुलायमसिंग यांनी 6 वर्षासाठी हकालपट्टी केली . मात्र अखिलेश यांनी पक्षाच्या 200 हुन अधिक आमदारांची फौज आपल्या बाजूने वाळविल्याने एकाच तासात मुलायम यांनी माघार घेत अखिलेश यांच्यावरील कारवाई मागे घेतली . कौटुंबिक संघर्षातून राजकीय रणधुमाळी पेटलेल्या उत्तर प्रदेशात आरपारची लढाई सुरु झाली . समाजवादी पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचे बळ लाभलेल्या मुख्यमंत्री अखिलेश यांनी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन बोलवून स्वतःचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक करवून घेतला . आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यांचे अध्यक्षपद काढून घेत त्यांना निवृत्तीची खुर्ची मार्गदर्शक म्हणून बहाल केली . या पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग आणि अखिलेश यांच्यात सायकल या निवडणूक चिन्हांवरून सुरु झालेला संघर्ष निवडणूक आयोगापर्यंत पोहचला . दरम्यान अखिलेश यांचे काका शिवपाल यादव यांनी समाजवादी सेक्‍युलर मोर्चा हा नवा पक्ष स्थापन करून त्याचे अध्यक्षपद मुलायमसिंग यांच्याकडे सोपविले . त्यानंतर अखिलेश यांचा गट हाच खरा समाजवादी पक्ष असल्याचा निर्वाळा देत आयोगाने त्यांनाच पक्षाचे अध्यक्ष जाहीर करत सायकल हे चिन्ह त्यांच्याकडेच सोपविले आणि या राजकीय सुंदोपसुंदीचा शेवट झाला

भाजपा स्पष्ट बहुमतात…

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालाने सर्वानाच अचंबित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार धडाका आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या रणनीतीमुळे भाजपने उत्तरप्रदेशमध्ये तीन चतुर्थांश जागा म्हणजे 403 पैकी 312 जागा जिंकत होळीच्या पूर्वसंध्येला विजयरंग उधळला . उत्तर प्रदेशच्या राजकारणात 37 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या पक्षाला 300च्या वर जागा मिळाल्या . आणि या विजयामुळे 14 वर्षांच्या वनवासानंतर भाजपने उत्तरप्रदेशाची सत्ता एकहाती काबीज केली . सत्ताधारी समाजवादी पक्षाला अर्धशतकही पूर्ण करता आले नाही . तर त्यांच्या मित्रपक्षाला कॉंग्रेसला दोन अंकी संख्याही गाठता आली नाही . उत्तर पप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे कट्टर हिंदुत्ववादी आणि वादग्रस्त नेते योगी आदित्यनाथ यांची वर्णी लागली . सत्ता प्रस्थापित करताच योगी यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यातील सुमारे 2 कोटी 15 लाख अल्प भूधारक शेकऱ्यांचे 1 लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले . उत्तर प्रदेशातील 16 पैकी 14 महापालिकांवर भाजपनेच आपला झेंडा फडकावला . तर दिल्ली महापालिकेतही 3 महापालिका भाजपच्याच ताब्यात गेल्या .

अरुणाचलमध्येही भाजपा…

उत्तरप्रदेशमधील शमत नाही तोच अरुणाचल प्रदेश मध्ये नाट्यमय घडामोडी घडून भाजपचे सरकार स्थापन झाले . राज्यातील पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेशमध्ये फूट पडली आणि मुख्यमंत्री खांडू यांच्यासह 13 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे सत्तांतर शक्‍य झाले.

उत्तराखंडतही फुलले कमळ…

उत्तरप्रदेश पाठोपाठ उत्तराखंडमध्येही भाजपने 70 पैकी 54 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला . या राज्यात सत्ताधारी कॉंग्रेसचे आव्हान 11 जागांमध्येच आटोपले . पंजाब मध्ये मात्र अमीरन्दर सिंग यांच्या नेत्तृत्वाखाली 47 जागा जिंकून कॉंग्रेसने 10 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन केले . पंजाबमध्ये आपने दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारत सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला तिसऱ्या जागेवर फेकले . गोवा आणि मणिपूर या दोन्ही राज्यात कॉंग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून समोर आला तरी जोडतोडीच्या राजकारणात भाजपने मुसंडी मारली आणि गोव्यात व मणिपूरमध्ये भाजपचिंच सत्ता प्रस्थापित झाली . गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकरांच्या गळ्यात माळ पडली.

पश्‍चिम बंगालमधील वाद…

पश्‍चिम बंगालमध्ये रोज व्हॅली चिट फंड घोटाळ्यावरून तृणमूल कॉंग्रेसचे गटनेते सुदीप बंदोपाध्याय याना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप मध्ये वाद उफाळून आला . आणि या वादाचे पर्यावसन दंगलीत झाले . तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जीनी याप्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली.

कर्नाटकात जय महाराष्ट्र…

कर्नाटकमध्ये 2017 या वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या महिलांचा पोलिसांच्या समोरच विनय भंग झाल्यामुळे देशभर जनक्षोभ उसळला . दुसरीकडे सीमा भागात मराठीची गळचेपी करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या कर्नाटक सरकारने जय महाराष्ट्र घोषणेविरुद्ध फतवा काढला . आणि अशा घोषणा स्थानिक संस्थांच्या सदस्यांना देता येणार नाहीत असा फतवाच काढला . कर्नाटकच्या या दहशतवादाविरुद्ध सीमाभागात संतापाची लाट उसळली . त्यावर जय महाराष्ट्र च्या घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक सरकारच्या धमकीना आपण घाबरत नसल्याचे दाखवून दिले.

शशिकला-पल्लानीस्वामी…

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदासाठी जंगजंग पछाडणाऱ्या शशिकला यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला यंदा लागला . दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह आरोपी असलेल्या बेहिशेबी मालमत्ता खटल्यात शशिकला याना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत 4 वर्षांची कैद सुनावली. आणि शशिकला यांची रवानगी कारागृहात झाल्यानंतर अखेर अण्णा द्रमुकच्या महासचिव शशिकला यांचे विश्वासू सहकारी इ . के . पल्लानीस्वामी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली .तर माजी मुख्यमंत्री ए . पनीरसेल्वम यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली . शिवाय तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री पल्लानीस्वामी यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव देखील जिंकला. जयललितांच्या निधनानंतर 2 गटांमध्ये विभागलेल्या अण्णा द्रमुकच्या दोन्ही गटांमध्ये 6 महिन्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या नाट्यानंतर अखेर दिलजमाई झाली आणि अण्णाचा हा पक्ष एकसंघ ठेवण्याच्या आणाभाका देखील घेतल्या गेल्या. जल्लीकट्टू खेळाला कायमस्वरूपी मान्यता मिळावी याकरिता तामिळनाडूत यंदा आंदोलन छेडले गेले . या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर तामिळनाडू विधानसभेत जलकट्टू संबंधीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली. आणि या खेळाचा मार्ग मोकळा झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)