घटनाचक्र 2017 अर्थकारण ; सामान्य माणसाच्या खिशावर डल्ला

नोटाबंदीतून सावरत असतानाच सामान्य माणसाच्या खिशावर भार टाकणारे आणखी काही निर्णय सरकारने एप्रिल महिन्यात जाहीर केले. त्यानुसार रोखीच्या व्यवहारांची मर्यादा 3 लाखांहून 2 लाख रुपयांवर आणण्यात आली. शिवाय वाहन व आरोग्य विम्यात देखील वाढ करण्यात आली. सरकारने नोटाबदलीनंतर कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार आघाडी उघडली होती. त्याचवेळी चलन तुटवड्यामुळे सुरुवातीचे काही महिने पेमेंट ऍप, इ. वौलेट, स्वाईप मशीन इत्यादी कॅशलेस व्यवहारांसाठी उपयुक्त पर्यायांचा जोरदार वापर झाला.

मात्र, कालांतराने पुन्हा नागरिकांनी रोख रकमांच्या व्यव्हारातच पसंती दर्शविल्याने कॅशलेसचा फुगा फुटला. एकूणच मागील वर्षीच्या नोटाबदलीरुपी शिमग्याचे कवित्व यंदाच्या वर्षी देखील आर्थिक व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात अखंडपणे सुरूच राहिलेले दिसले. परंतु या सर्व आर्थिक परिवर्तनाचा नाहक ताप सर्वसामान्यांना विशेषतः गोरगरिबांनाच झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त झाली.

इंधनाची दरवाढ
सरकार सबका साथ सबका विकास अशी उद्‌घोषणा करत सर्वसामान्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत असतानाच दुसरीकडे मात्र आर्थिक परिवर्तनामुळे सर्वसामान्यांना सरकारच्या विविध निर्णयांमुळे आर्थिक फटका बसला होताच. त्यातच सालाबादप्रमाणे यंदाही महागाईच्या भस्मासुरामुळे गोरगरिबांना जगणे नकोसे झाले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल 1 रुपया 29 पैसे, डिझेल 97 पैसे आणि घरगुती गॉस सिलिंडर 2 रुपये च्या किमतीत वाढ झाली. मात्र मे महिन्यात जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत घट झाल्याने व रडॉलरचे मूल्य देखील घटल्याने या किमतीत 2 रुपयांनी खाली आल्या पेट्रोल व डिझेलचे दर दरदिवशी बदलण्याचा देशातील 5 शहरात केलेला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे केंद्र सरकारने हीच पद्धत देशभर राबविण्याचा निर्णय देखील यंदा घेतला.

गॅसची महागाई
दरम्यान, सरकारने घरगुती वापरातील अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरचे भाव देखील सरासरी 90 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पुढल्या वर्षांपासून गॅस सिलिंडरची सबसिडी पूर्णतः संपुष्टात आणण्यासाठीच सरकारने सिलिंडरच्या किमतीत दरमहा 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. जो सामन्यांचे आर्थिक बजेट बिघडवणाराच होता.

दुधाचे दर वाढले
त्यानंतर महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघानी दुधाचे दर 2 रुपयांनी वाढविले जुलै महिन्यात टोस्पो या विषाणूची बाधा झाल्यामुळे टोमॅटोचे पीक न घेतल्यामुळे टोमॅटोचे भाव अक्षरशः शंभरीवर पोहोचले. भरीस भर म्हणून ऐन पावसाळ्यात महागाईचा भडका उडाल्याने आणि शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्या आणि कडधान्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला. सप्टेंबर महिन्यात कांद्याने गृहिणींना रडवले. कांद्याचे दर 80 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले.

पालेभाज्या आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईचा ऑक्‍टोबर महिन्याचा निर्देशांक हा उच्चांकी पातळीवर पोहोचून 3.59 इतका नोंदवला गेला. एकूणच या वाढत्या महागाईला तोंड देता देता सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले अशी एकूण अवस्था होती.

हॉटेलचे सेवाशुल्क घटले
महागाईमुळे सर्वसामान्यजन त्रस्त झालेले असतानाच हॉटेल बिलात आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे अनिवार्य नसून ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असल्याचे सरकारने स्पष्ट केल्याने सामान्यांना थोडा दिलासा मिळाला. शिवाय राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दुहेरी एमआरपी कायदा बेकायदा ठरवल्याने मॉल्समधील पाकीटबंद खाण्याच्या वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या दुप्पट तिप्पट किमतींपासून ग्राहकांची सुटका झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)