घटनाचक्र २०१७ न्यायालयीन घडामोडी

अबू सालेमला जन्मठेप
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात गॅंगस्टर अबू सालेमसह करीमुल्ला खान याला जन्मठेप सुनावण्यात आली. पाचवा आरोपी रियाज सिद्दीकी याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. बॉम्बस्फोटामध्ये 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली होती. टाडा न्यायालयाचे नायमूर्ती जी. ए. सानप यांनी ही शिक्षा सुनावली.

गोध्राप्रकरणी फाशी रद्द
अयोध्येहून साबरमती एक्‍स्प्रेसने परतणाऱ्या कारसेवकांच्या रेल्वेबोगीला आग लावून 59 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गोध्रा जळीतकांडातील 11 दोषींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. ही फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली गेली. बालविवाहाच्या बेकायदा प्रथेतील कायदेशीर अपवाद दूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. एकीकडे बालविवाह बेकायदा ठरवतानाच 15 ते 18 वयोगटातील अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास मात्र मोकळीक देणारे अपवादात्मक कलमच न्यायालयाने बेकायदा ठरवले आणि अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध म्हणजे गुन्हा ठरवला. देशातील बहुचर्चित आरुषी हेमराज हत्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने राजेश आणि नुपूर तलवार दाम्पत्याची ठोस पुराव्यांअभावी सुटका केली.

नदीप्रदूषण चर्चेत
शास्त्रोक्त प्रक्रिया न करता धोकादायक सांडपाणी बिनदिक्कत नदीत सोडून देण्याच्या कारखान्यांच्या प्रवृत्तीतील व त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सरकारच्या अनास्थेला अखेर सर्वोच्च न्यायालयानेच दणका दिला. उल्हास व वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडण्याच्या प्रकारावर आक्षेप घेत न्यायालयाने या नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकारला 100 कोटींची तरतूद करणे भाग पाडले आहे. 2 महिन्यांत ही तरतूद केली जाईल असे राज्य सरकारने स्पष्ट केले.

नितीन आगे प्रकरण
राज्यभर गाजलेल्या खर्डा येथील नितीन आगे हत्याप्रकरणातील सर्वच्या सर्व 9 आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी सुटका केली. सवर्ण मुलीशी प्रेमप्रकरणातून नितीन आगे याची हत्या झाल्याचा आरोप करीत दलित संघटनांनी आवाज उठवला होता. अवघे राज्य हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार व खून प्रकरणी अखेर न्याय झाला. या प्रकरणात दोषी ठरवलेल्या जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे या तीन नराधमांना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर आपल्याला न्याय मिळाला अशी भावना पीडित मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.

2017 या संपूर्ण वर्षात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निकाल जसे दिले त्याप्रमाणेच काही महत्त्वपूर्ण प्रकरणात सरकारला वेळोवेळी निर्देश देखील दिले. देशातील अंदाजे 100 कोटी मोबाइलधारकांचे क्रमांक वर्षभरात आधारही जोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला. सिमकार्डचा गैरव्यवहार आणि मोबाइलच्या माध्यमातून बॅंकींग आणि अन्य आर्थिक सुविधा वापरण्याचे प्रमाण वाढू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे निर्देश दिले गेले.

सहारा समूहाला दणका
गुंतवणूकदारांचे पैसे देण्यात चालढकल करत न्यायालयाकडून तारीख पे तारीख घेणाऱ्या सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय याना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला. संतापलेल्या न्यायालयाने 14 हजार कोटींचे मूल्य असलेली पुण्याजवळील अँबी व्हॅलीची मालमत्ता विकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

बाबरीप्रकरणी आडवाणींवर आरोपपत्र
25 वर्ष जुन्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लखनौतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह सर्व 12 आरोपींवर कलम 120 अनव्ये बाबरी मशीद पाडण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित केला. तत्पूर्वी याच न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.

नवे सरन्यायाधीश नियुक्त
न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी देशाचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्ययाधीशाच्या पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारताचे उमेदवार दलवीर भंडारी यांची पुन्हा निवड झाली. संयुक्त राष्ट्राच्या दोन तृतीयांशाहून अधिक सदस्य देशांनी भारताला पाठिंबा दिल्याने नाट्यपूर्ण घडामोडीनंतर ब्रिटनला आपला उमेदवार मागे घ्यावा लागला आणि भारताचा विजय झाला.

एकूणच गेल्या संपूर्ण वर्षात अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि नागरिकांची उत्सुकता ताणून धरणाऱ्या अनेक खटल्यांचा निकाल लागला तर समाजव्यवस्था सुधारण्यासाठी याच न्यायव्यवस्थेने आपल्या अधिकारांचा वापर करत अनेक चांगले निर्णय जाहीर करून या समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्नच केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)