घंटागाडी चालकांच्या पोटावर मारण्याचे पातक

अशोक मोने यांची टीका:दंडात्मक कारवाई केल्यास तीव्र आंदोलन
सातारा, दि. 13(प्रतिनिधी)- निवडणूकीवेळी पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्‍त आणि दहशतमुक्‍त कारभार करणार अशी भाषणबाजी करणाऱ्या खासदारांच्या आघाडीने सत्ता मिळाल्यानंतर सातारा पालिकेचा बिहार करुन टाकला आहे. सातारा विकास आघाडीच्या मग्रुर आणि मुजोर नगरसेवकाने पालिका कार्यालयात धूडगूस घालून कर्मचाऱ्यास मारहाण केली. याच्या निषेधार्थ घंटागाडी चालकांनी कामबंद आंदोलन केले होते. अन्यायाविरोधात आंदोलन करणारांना न्याय तर मिळालाच नाही पण, सत्ताधाऱ्यांच्या दंडेलशाहीमुळे आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेच्या काडीलाही हात लावला जात नव्हता. त्याच छत्रपतींच्या राजधानीत घंटागाडी चालकांच्या पोटावर मारण्याचे पातक घडत आहे. हेच का छत्रपतींचे शासन, असा बोचरा सवाल करतानाच घंटागाडी चालकांवर अन्याय केल्यास नगर विकास आघाडी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा पालिकेचा कारभार कोणत्या तत्वाने सुरु आहे हे सातारकर उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. गटारातून, कचऱ्यातून आणि घाणीतून फक्‍त पैसा उकळण्याचे काम पालिकेत सुरु आहे. तत्व सांगणाऱ्या नेत्यांच्या आघाडीचे नगरसेवक गोरगरीब घंटागाडी चालक आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहेत. मराठ्यांच्या राजधानीतच गोर-गरीबांवर दंडेलशाही आणि धाकधपटशाहीचा वापर करुन त्यांच्या पाटीवर आणि पोटावर मारण्याचे पातक सुरु आहे. छत्रपती शिवाजी महारांच्या काळात रयतेच्या, गोरगरीबांच्या पिकाच्या देठालाही हात लावण्याचे धाडस कोणी करत नसे. आज त्याच छत्रपतींच्या राजधानीत गोर गरीब घंटागाडी चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. सातारा पालिकेच्या कार्यालयात स्वत:ला पालिकेचा मालक समजणारा नगरसेवक कर्मचाऱ्यांना मारहाण करतो. पालिकेत धूडगूस घालून कर्मचाऱ्यांना वेठीस धरतो. या मग्रुर नगरसेवकावर नेत्यांकडून मात्र कोणतीच कारवाई झाली नाही पण, लोकशाही मार्गाने आंदोलन करुन न्याय मागणाऱ्यांवर मात्र 1 लाख 60 हजाराचा दंड ठोठावला जातो. कारवाई होणार नाही असा नेत्यांनी शब्द देवूनही या गोरगरीबांवर अन्याय केला जातो. याला छत्रपतींच्या राजधानीत सुरु असलेली मोगलाई म्हणायचे का, असा खोचक सवाल मोने यांनी उपस्थित केला आहे.

नगरविकास आघाडी नेहमीच पालिका कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून यापुढेही पालिका कर्मचाऱ्यांवरील आणि घंटागाडीचालकांवरील अन्याय खपवून घेणार नाही. सत्ता आहे म्हणून मनमानी आणि धाकधपटशाही करणे थांबवा. मग्रुर आणि मुजोर नगरसेवकावर कारवाई करण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांच्यात नाही हे वारंवार सिध्द झाले आहे. धुडगूस घालणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या गोरगरीब घंटागाडी चालकांना दंड ठोठावण्याऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या नेत्यांनी भलतीच मोकळीक दिली आहे. असे असले तरी, घंटागाडी चालकांवरील अन्याय कदापी सहन केला जाणार नाही. त्यामुळे घंटागाडी चालकांवर केलेली कारवाई त्वरीत स्थगित करुन या गोरगरीबांच्या पोटावर मारु नका. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, असा इशारा मोने यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)