पिंपरी – पिंपरीतील काळेवाडी फाटा येथील ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी प्राधिकरणाने महापालिकेला जागा देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे, ग्रेड सेपरेटर बांधणीचा मार्ग मोकळा झालेला आहे. या निर्णयामुळे आयटी कंपन्यांकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याला मदत होणार आहे.
औध-रावेत मार्गावर पिंपरी प्राधिकरणाने उड्डाणपूल बांधला असून या पूलावरुन गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून वाहतूक सुरु आहे. मात्र, तरीही डांगे चौक, काळेवाडी फाटा, साई चौक, जगताप डेअरी चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामधील साई चौकातील प्राधिकरण आणि महापालिकेचा उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधणीचे काम हाती घेतले आहे. सध्या काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती या दरम्यान साडेचारशे मीटर लांबीचे दोन ग्रेड सेपरेटर बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने प्राधिकरणाकडे अतिरिक्त जागेची मागणी दोन महिन्यांपूर्वी केली होती. प्राधिकरणाच्या सभेत ग्रेड सेपरेटरसाठी चौदाशे चौरस मीटर अतिरिक्त जागा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
रावेत ते औध बीआरटी मार्ग आणि काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्ती या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे, उड्डाणपूल तयार होऊनही वाहतूक कोंडीचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. परंतु, ग्रेड सेपरेटर पूर्णत्वास आल्यानंतर वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे. काळेवाडी फाटा ते कस्पटे वस्तीच्या दिशेने येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी दोन ग्रेड सेपरेटर बांधले जाणार आहेत. तसेच, औध ते रावेत मार्गावर ग्रेड सेपरेटर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा