ग्रेट पुस्तक : माझी जन्मठेप

अस्मिता’च्या वाचकांना माझा मनापासून नमस्कार…

ज्या वयात एखाद्या युवकाने संसाराची सुखी स्वप्ने रंगवायची, हौस, मौजमजा करत आपण मिळवलेल्या बॅरिस्टरपदाचा अभिमान बाळगायचा, कौतुक करून घ्यायचे, त्या वयात तो क्रांती घडवू पाहात होता…. त्या युवकाला भूक होती देशभक्तीची, त्याला चीड होती गुलामगिरी आणि लाचारीची. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांची दुःखं महत्त्वाची… हो त्या युवकाने ठरवले होते त्याच्या जगण्याचे ध्येय आणि टाकले पहिले पाऊल जुलमी सरकार विरुद्ध बंड पुकारण्याचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हणूनच आजचा अभिप्राय स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकारी ग्रंथाबद्दल म्हणजेच, “माझी जन्मठेप’ या आत्मचरित्रपर पुस्तकाबद्दल. वर्ष 1910 चा काळ आणि सावरकरांना इंग्लिश ऑफिसर जॅक्‍सनच्या वधाच्या कटात सामील असण्याच्या कारणामुळे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पन्नास वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा. जिवंतपणी नरकयातना… मुंबईतील डोंगरीचे कारागृह, त्यानंतर भायखळा, आणि नंतर तो भयंकर प्रवास अथांग समुद्राच्या पार अंदमानचा…

विनायक दामोदर सावरकर यांना कैद झाल्यापासूनचा हा प्रवास वाचताना सहृदय व्यक्ती नकळत अश्रू ढाळायला लागते. मनात त्यांच्याप्रति अभिमान निर्माण होतो. पन्नास वर्षे सक्तमजुरी म्हणजे आयुष्याची संध्याकाळचं. ही शिक्षा ऐकूनही ते न डगमगता धैर्याने आल्या प्रसंगाला तोंड देत होते. अंदमानातील काळकोठडीचे वातावरण म्हणजे कुठे प्रकाशाचा कवडसाही येऊ नये अशी व्यवस्था, हातातून रक्त येईपर्यंत काम, अन्नपाण्यासाठी या कैद्यांना तरसावे लागत असे.

अतोनात क्रूर छळ, वर्षातून एकदा घरच्यांना एखादे पत्र कधीकधी तेही नाही… सावरकरांना कैद झाली तेव्हा जेमतेम ते 25 वर्षांचे होते. त्यांची पत्नी 20 वर्षांची होती. अंदमानात जाण्यापूर्वी त्यांची झालेली भेट हृदयद्रावक आहे.

सावरकर म्हणतात, “जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही, बाहेरचा काही आवाज नाही, दिवस आहे की रात्र हे कळत नसे. चोवीस तास क्रूर पहारेकऱ्यांचा पहारा, काही वाचायला नाही, कोणाशी बोलण्याची मुभा नाही. सक्तमजुरीची शिक्षा, अन्न ही किडे-आळ्या असलेलं. शारीरिक विटंबना तर करत होतेच, पण मानसिकरीत्याही खच्चीकरण आणि हीन दर्जाची वागणूक अशा परिस्थितीत काय आणि कसे समाजव्रत घेऊ?’

पण तरीही त्यांनी आहे त्या स्थितीचा स्वीकार केला अनेक ग्रंथ लिहीले. भिंतीवर अणकुचीदार दगडाने कविता लिहून ठेवल्या. प्रत्यक्ष मृत्यूला हरवून 1924 ला काही अटींवर ते बाहेर आले. “ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला…’ ही आर्त हाक त्यांचीच! काही काळाने ते मातृभूमीत परत आले. हा ग्रंथ त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लिहिण्यास सुरुवात केली. पूर्ण झाल्यावर त्यावर बंदीही आणली गेली, पण नंतर याचा खप खूप वाढला.

या ग्रंथातील भाषा सावरकरांसारखीचं तेजस्वी, धाडसी आहे. त्यामुळे वाचक त्यात गुंतून पडतो हा ग्रंथ फक्त अंदमानातील छळ याचेच वर्णन करत नाही, तर तो समस्त वीरांनी देशसेवेसाठी सहन केलेल्या कष्टाचे, बलिदानाचे आपल्या समोर उदाहरण ठेवतो.. तरुणांना प्रेरणा देतो. अशा महापुरुषांचे ग्रंथ वाचून त्यांना आपण मानाचे वंदन नक्कीच करू शकतो… एकदा तरी नक्की नक्की वाचा हे पुस्तक “माझी जन्मठेप’!
धन्यवाद.

– मनीषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)