ग्रेट पुस्तक : “नाथ हा माझा’

शब्द अपुरे पडावे अशी बुद्धिमत्ता, सौंदर्याने लाजावे असे राजबिंडे रूप, कलेने पायाशी लोळण घ्यावी अशी अभिनय क्षमता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले नाव एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल डॉ. काशिनाथ घाणेकर! निळ्या डोळ्यांची जादू कशी झाली ते सांगत आहेत त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर. तर आजचा अभिप्राय “नाथ हा माझा’ या पुस्तकासाठी.

खूप दिवसांपासून डॉ. काशिनाथ घाणेकरांबद्दल चर्चा सुरू होतीच त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटामुळे. पण त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी नाथ हा माझा उत्तम पर्याय आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर एक असा अभिनेता ज्याने अभिनय स्वतःच्या अंगाअंगात मुरवून घेतला होता. पहिली पत्नी इरावती या निष्णात स्त्री रोगतज्ज्ञ होत्या पण तरीही मातृत्वापासून वंचित. घाणेकरांना लहान मुलांची प्रचंड आवड पण इरावती बाईंचा दत्तक मुलाला विरोध. घाणेकरांनी मग स्वतःला अभिनयात झोकून दिले. रायगडाला जाग येते यात त्यांनी केलेली संभाजी महाराजांची भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतली. याच नाटकाच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांची एकुलती एक कन्या कांचन यांच्याशी ओळख झाली. कांचन याना घाणेकरांबद्दल ओढ निर्माण झाली. घाणेकरांचा अभिनय, सौंदर्य, निळे डोळे अन भारदस्त आवाज यामुळे त्या प्रभावित झाल्या. सततच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यावेळी त्या अवघ्या चौदा वर्षांच्या होत्या. घाणेकरांहून पंधरा वर्षांनी लहान. हळूहळू ही बातमी सुलोचनाबाईपर्यंत पोचली, कोवळ्या वयातील प्रेम म्हणून घरच्यांकडून त्याला विरोध होताच त्यानंतर मात्र त्यांना घाणेकरांना भेटणे, बोलणे, त्यांची नाटकें पाहणे यावर बंदी घालण्यात आली.

यश अपयश पचवत घाणेकरांचा प्रवास सुरू होता त्यात त्यांना असलेली व्यसने अधिक प्रमाणात उफाळून येऊ लागली. दारूमुळे त्यांच्या आवाजावर परिणाम होऊ लागला त्यामुळे त्यांना नाटकात काम करणेही जमेनासे होऊ लागले चांगल्या भूमिका त्यांना दुरावत चालल्या. अनेक स्त्रियांसोबत असलेले प्रेमसंबंध आणि दारू यामुळे इरावतीबाईंनी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला. या घटनेने ते अजूनच कोलमडून पडले. तरीही कांचन यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नसल्याकारणामुळे शेवटी घरातून त्यांच्या लग्नाला संमती मिळाली अन्‌ त्या छत्तीस वर्षांच्या आणि घाणेकर एकावन्न वर्षांचे असताना त्यांचे लग्न झाले. वाढत्या वयाचा विचार करून त्यांनी मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही. लग्नाच्या दहा दिवसांतच कांचन यांना त्यांच्या अतिरेकी दारू, लोकांसोबत उद्धट वागणे, राग, चिडचिड याचा प्रत्यय येऊ लागला अन्‌ त्यांनी सुलोचनाबाईंकडे जाण्याचा निर्णय घेतला. हे पुस्तकं फक्त जीवनचरित्र नसून एक शिकवण आहे.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक माणसाला शेवटी नेस्तनाबूत करू शकतो. कोणत्याही गोष्टीत टोकाची भूमिका घेणारा स्वभाव आणि व्यसन या दोन गोष्टीनी घाणेकरांना असामान्यातून सामान्य लोकात आणून बसवले ही गोष्टही त्यांच्या पचनी पडली नाही. सतत यशाच्या शिखरावर असणाऱ्या कलाकाराला अपयश पचवता आले नाही. पु. ल. यांनीसुद्धा या पुस्तकात डॉ. घाणेकर यांच्याबद्दल विलक्षण मत नोंदवले आहे पुस्तकं वाचताना तुमच्या लक्षात येईनचं ते. कांचन घाणेकरांचे प्रेम, आणि काशिनाथ घाणेकरांचा रंगभूमी प्रवास ते शेवट जाणून घेण्यासाठी नाथ हा माझा हे पुस्तकं नक्की वाचा. पुन्हा नवीन पुस्तकासह आपल्याला लवकरच भेटेन.

धन्यवाद.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)