ग्रेट पुस्तक : ‘दुर्री – द सेकंड लेडी’

अस्मिताच्या वाचकांना मनापासून नमस्कार.

प्रत्येकवेळी आपण किती सोईस्कररित्या हे विसरतो की आपणही माणूस आहोत कधी तरी होतात चुका. पण त्याचा स्वीकार करून आपल्याला पुढे चालताही येते नव्हे चालावेच लागते. आणि चालावेच. भावनांची गुंतागुंत नकळत होत जाते केंव्हा तरी पण त्यात किती गुंतून पडायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. कुठे थांबायचे हे कळलेच पाहिजे प्रत्येकाला. जीवनात काही गोष्टी येण्याची जशी एक वेळ असते, तशीच तिची जीवनातून जाण्याचीही, पण बऱ्याच वेळा कळूनही पळत्याच्या पाठी आपण लागत असतो आणि शेवटी हातात काय तर मनस्ताप, दुःख, आणि या सगळ्यांची गोळाबेरीज पुन्हा एकच चुका आणि फक्त आयुष्यात घडत चाललेल्या चुका.

-Ads-

कधी कधी खूपच गहन, गुंतागुंतीचे वाचण्यापेक्षा सहज आणि हलके फुलके वाचायला नक्कीच छान वाटते. कुठे तरी या सहजमधे आपल्याला आपलीच नव्याने ओळख होते आणि काही घटना आपल्या बाबतीत ही घडून गेल्या आहेत याचा प्रत्यंतर येतो. तर आज मी एका अशाच हलक्‍या-फुलक्‍या पुस्तकाबद्दल सांगणार आहे ज्याचे नाव आहे, राजा भोयर लिखित “दुर्री – द सेकंड लेडी.’

या कथेची सुरवात होते माधवच्या विवाहापासून. घरात आलेली वासंती कधीच माधवच्या प्रेमाचा स्वीकार करू शकत नाही.काही दिवसातच ती तिच्या प्रियकरासोबत निघून जाते. माधव आणि कुटुंब यातून लवकरच सावरते. माधवचे दुसरे लग्न होते शालिनीसमवेत. शालिनीसारखी पत्नी मिळूनही माधवचे मन स्त्रियांच्याबाबतीत चंचलच असते. यातून त्याच्या आयुष्यात अनेक स्रिया येतात.

माधवची पत्नी देवभोळी असल्याने तिचा भविष्य आणि महाराजांवर विश्वास असतो. यातच दारात आलेले एक महाराज तिच्याबद्दल आणि तिच्या दोन मुली आणि दोन मुले यांबद्दल भविष्यवाणी करतात. जसे जसे दिवस जाऊ लागतात तसतसा तिला त्याचा प्रत्यय येऊ लागतो. माधव आणि शालिनीचा सर्वात लहान मुलगा याच्याबाबत महाराज दोन स्त्रिया त्याच्या आयुष्यात येतील असे भाकीत करतात, आणि त्याभोवती त्याचे संपूर्ण आयुष्य गुंफले जाते. त्याच्या आयुष्यात ती सेकंड लेडी येते का ? पुढे काय होते यासाठी तर तुम्हाला पुस्तकं वाचावेच लागेल. वरवर दिसणारी कथा असली तरी विचार करायला मात्र लावते.

छोट्या गावातील पात्र असल्यामुळे ग्रामीण भाषेचा पगडा पुस्तकात जाणवतो. पत्त्यातील दुर्री जशी गरजेची असली तरी कायम दुर्लक्षितच राहते तसेच काहीसे त्या सेकंड लेडीचे होते. तुम्ही कितीही अमान्य केले तरी प्रत्येकाच्या मनात अशी ऐक दुर्री नक्कीच असते. किंवा ती असावी असे वाटते. प्रत्येक वेळी ती शारीरिक कारणासाठीच असेल असे नाही कुठे तरी मानसिक गरज, आधार आपुलकीचे शब्द, सुखदुःखाची देवाण-घेवाण यासाठीही असू शकते. लेखकाने स्त्रीलंपट पुरुषाचे तसेच मजबुरीने अशी काम करावी लागणाऱ्या स्त्रीची अगतिकता मनमोकळेपणाने लिहिली आहे. भविष्यावर विश्वास ठेवणारा अडाणी समाज आणि पुढे शिक्षित असूनही त्यातच गुरफटून जाणारा त्या प्रमाणे कृती करणारा समाज याचे ज्वलंत चित्र लेखकाने उभारले आहे. प्रेमात पडायचं पण वाहवत जायचे नाही. प्रसंगी त्यागाचीही तयारी ठेवायची. अपयश आलं तर दुःख गोंजारत बसायचे नाही; पुन्हा उठायचे, पुढे चालायचे. चालताना दुःख मागे ठेऊन आपल्या आयुष्यावर प्रेम करणे शिकायचे. हाच संदेश या पुस्तकातून लेखकाला द्यायचा आहे, हे स्पष्ट आहे.

– मनिषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)