ग्रेट पुस्तक : तीन तलाक विरुद्ध पाच महिला

अस्मिताच्या वाचकांना नमस्कार.

आज एका अशा ज्वलंत विषयाला हात घालावासा वाटला. कारण, ती उपेक्षित राहिली नेहमीच आणि तिला समजून घेणारा समाज नेहमीच कमी असतो. तिला सहन करता येते म्हणून काय सतत करायचा का अन्याय. तुमचे तीन शब्द तिला कदाचित जवळ आणू शकतील; पण तेच तीन शब्द तिचे आयुष्य बरबाद करायला निघत असतील तर तिने गप्प राहावे का? ती धडपडते संसारासाठी, ती जगते कुटुंबासाठी, तिच्या स्वत:च्या जगण्यावरही ही बंधने लादून घेते छळ निमूट सहन करते, प्रसंगी मारही खाते, केवळ त्याच्यासाठी. आणि एवढे सगळे करून तिच्या नशिबात काय तर तिला दूर केले जाते निर्दयपणे, तिच्याच लेकरापासून, अस्तित्वापासून, सोडले जाते वाऱ्यावर दुःख भोगण्यासाठी, तेही अनपेक्षितपणे.. फक्त तीन शब्दात… मग ती पेटून उठते हक्कासाठी, जगण्यासाठी… धर्म वेगळे असले तरी एक स्त्री म्हणून मी जशी तिला समजू शकते, तिच्या छोट्या छोट्या गरजा, अपेक्षा समजू शकते, तसेच ज्यांना आपल्या आई, बहिणी, बायको, प्रेयसीबद्दल नितांत आदर आहे असे सुहृदयाची लोकं नक्कीच तिला समजून घेतील; कारण तिचा लढा कोणत्या जाती-धर्मासाठी नसून फक्‍त
स्वतःच्या सन्मानार्थ, माणूस म्हणून जगण्यासाठी असतो… फक्‍त तीन शब्द तिच्या आयुष्याची माती करण्यासाठी सज्ज होतात, “तलाक, तलाक, तलाक!’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा लढा मोडून काढणाऱ्या पाच रणरागिणी आणि त्यांना जनमानसात मानाचे स्थान मिळवून देणारी धाडसी लेखिका हिना-कौसर खान पिंजार यांचे “तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ हे साहसी पुस्तक वाचण्यात आले अन अगदी भारावून गेले… खरं तर तलाक या शब्दाची भीषणता नेहमी जाणवत असायची आणि तीन वेळा हा शब्द उच्चारला की जन्मोजन्मीची नाती संपुष्टात कशी येऊ शकतात याचे राहून राहून आश्चर्यही वाटायचे.

सायराबानो पहिली स्त्री जी स्वतःच्या हक्कासाठी न्यायालयाची पायरी चढली ती तिहेरी तलाकच्या विरोधात. तेरा वर्षाचा संसार, सासरचे प्रेम कधी मिळालेच नाही. नवरा मारहाण करायचा, आठ वेळा घरगुती विषारी औषधांनी गर्भपात करायला नवऱ्याने भाग पाडले, विषारी औषधे तिच्या शरीरात भिनून तिला मरणाच्या दारात उभी करू लागली, पण त्याला ओढ दुसऱ्या लग्नाची! तिला तशाच अवस्थेत एक दिवस माहेरी सोडून आला आणि तलाक दिला. तिला कळेना कुठे चुकली ती, सगळे सहन करायला तयार असूनसुद्धा? मुलांना तिच्यापासून दूर केले गेले. सुदैवाने माहेरी माणुसकी होती पित्याची छत्रछाया, साथ, तिला लढण्यास बळ देऊन गेली. त्यातच अनेक देवमाणसं भेटत गेली, तिच्यासारख्या निष्पाप मुलींच्या वाट्याचे दुःख दूर करण्यासाठी!

आफरिन रेहमान “तिहेरी तलाक’ विरोधात उभी राहणारी दुसरी महिला. सुशिक्षित घरात वाढलेली, पुढे लग्न ही अशाच उच्चशिक्षित घरात, नवरा वकील, लग्न झाले आणि सुखी संसार चालू झाला नवरा-बायकोमध्ये प्रेम होतेच. अशात एक दिवस वडील नसलेली ती अचानक आईलाही एका अपघातात गमावते. नवरा सोबतीला असतोच, पण दहाच दिवस,
दुःखातून पुरती न सावरलेली ती अचानक तिला “तलाक”चा लेखीनामा मिळतो. तिच्याशी असलेले सगळे नाते तुटल्याचे जाहीर. का ? कारण न पटणारे, तिचा लढा तुम्ही या पुस्तकात नक्की वाचा…

अतिया साबरी, इशरत जहॉं, गुलशन परवीन… या सगळ्यांच्याच वेगळ्या कथा, वेगळ्या व्यथा, पण नंतर ध्येय एकच त्यांच्यासारखी दुर्दैवी पुन्हा कोणी असू नये. एखाद्या व्यक्तीशी पटत नसल्यास समजुतीने दूर होणे किंवा त्याला तशी कल्पना देऊन दूर होणे एक वेळ नक्कीच मान्य करता येईल. पण अमानुषपणे जगण्याचा हक्कही हिरावून घेणाऱ्या मानसिकतेला मोडीत काढणे आवश्‍यक बनले होते. त्यांचा विरोध समाजाला, जातिव्यवस्थेला नसून जुन्या रूढीचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना छळणाऱ्या, स्वार्थी पुरुषांना होता आणि यात त्यांना साथ मिळाली त्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाची ज्यांनी रूढीपेक्षा, जातीपेक्षा माणुसकीला महत्त्व दिले. सलाम अशा धैर्यवान स्त्रियांना आणि त्यांना साथ देणाऱ्या माणसांना…हिना कौसर खान यांचे हे पुस्तकं नक्कीच वाचण्यासारखे आहे.

– मनिषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)