ग्रेट पुस्तक : आवर्तन

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार….

आजचा अभिप्राय आहे लेखिका सानिया यांच्या “आवर्तन’ या कादंबरी वर. या लेखिकेने अनेक कथा, दीर्घकथा, कादंबरी अशा अनेक प्रकारात आपल्या लेखणीची जादू वाचकांवर सोडून मंत्रमुग्ध केले आहे. अनेक साप्ताहिके, तसेच मासिकातून त्यांनी केलेले लेखन लोकांच्या मनात रुजले आहे. त्यांची 16 पुस्तके काही वर्षातच प्रकाशित झाली अन एक वेगळी ओळख त्यांना मिळाली.

-Ads-

आज त्यापैकीच एक “आवर्तन’ ही लघुकादंबरी वाचण्यात आली. तिची कथा सहज सुंदर आहे. सुरुची नावाच्या एक स्वतंत्र विचारांच्या तरुणीभोवती ही कथा फिरते. सुरुची तिच्या नानीकडे म्हणजेच आज्जीकडेचं लहानाची मोठी होते. खरं तर नानी कडक शिस्तीच्या असल्यामुळे सुरुची जसजशी मोठी होते तसतशी ती बंधने तिला नकोशी वाटायला लागतात.तिचे आई वडील तिला नानीकडे सोडून परदेश गाठतात, स्वतःच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी. स्वरूप ही सुरुचीची छोटी बहीण नेहमीच आई वडिलांच्या वागण्याला कंटाळलेली! तिला सुरुचीबद्दल वाटणारे प्रेम कथेमधे रंग भरते. सुरुची जेंव्हा लग्नाविना एका तरुणासोबत राहण्याचा निर्णय घेते तेंव्हा मात्र तिला नानींच्या घराचे दरवाजे बंद होतात आणि तिचा प्रवास सुरु होतो.

पण सगळे ठीक ठाक चाललेले असताना तिच्या प्रियकराचा अपघात होतो व त्यातच मृत्यू त्याला गाठतो. त्याच्या अशा जाण्याने सैरभैर झालेली सुरुची पार कोसळून पडते. यात तिची मैत्रीण तिला खूप मदत करते अन पुन्हा नानीच्या घरी जाण्याचा सल्ला देते. तब्बल सहा वर्षांनी ती घरी परतते. पण तिला जाणवते सगळे आहे तसेच आहे! तिची घुसमट व्हायला लागते अन पुन्हा एकदा तिचा निर्णय होतो घर सोडण्याचा. पुन्हा एकदा तेच “आवर्तन’ तिचे आयुष्य व्यापायला कारणीभूत ठरू लागते. नियतीने तिच्यासाठी आखून दिलेले “आवर्तन’ त्यातून ती बाहेर पडू शकते की नाही हे तुम्ही पुस्तकामधेच वाचाल तर अधिक चांगले. सानिया यांचे लेखन शेवटी विचार करण्यास प्रवृत्त करणारे असून शब्दांची मांडणी सहज सोपी असली तरी वाचकांना कथेची सुरुवात समजण्यास थोडा वेळ द्यावा लागतो. कथा कुठेही भरकटत जात नाही.

वाचकांना खिळवून ठेवण्यात लेखिका नक्कीच यशस्वी झाली आहे. कुठे तरी ही मनाच्या कोपऱ्यातील आवर्तनाच प्रत्येक जीव अनुभव घेतच असतो..कथा अतिशय छान आहे. नक्की वाचा. सानिया यांच्या “स्थलांतर’, “अवकाश’ या कादंबऱ्याही वाचण्यासारख्या आहेत. जमल्यास त्याही नक्की वाचा. आपणास आवडेल अशी अपेक्षा. धन्यवाद.

– मनीषा संदीप

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)