ग्रेट पुस्तक : आजोबा

अरे चंद्रा..
तूच होतास आजोबांच्या
गोष्टींचा साक्षीदार…
गोष्टीत होत्या चांदण्या
तुझ्या नक्षीदार…

किती भाग्यवंत ती सगळी ज्यांनी हे आजोबा नावाचे सुख पुरेपूर अनुभवले. नशिबाने माझ्या वाट्याला हे सुख फार आले नाही. दोन्ही आजोबा फार लवकर गेले. माझे खूप लाड करायच्या आधीच. मनातली ही सल कायमचीच असायची. पण आज एक पुस्तकं हातात पडले आणि कुठे तरी आजोबा काय असतात नव्याने समजले. पुस्तकाचे नाव आहे “आजोबा.’ हा कविता संग्रह चिंतामणी प्रभाकर मोघे यांनी लिहून खरं तर आपल्याला पुन्हा एकदा आजोबा मिळवून दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजच्या काळात आजी आजोबा ही संकल्पना खरे तर लोप पावत चालली आहे. वृद्धाश्रमाचा वाढत्या गर्दीवरून लक्षात येतच आहे. संस्काराचे मोती, मायेची ऊब, यांच्या पंखाखालीच तर मिळते. तरीही काही घरात आजी आजोबा का नकोसे होतात खरंच कळत नाही. मुलांना मोबाइल, टी.व्ही. पेक्षा कुठल्याही सुखसोई पेक्षा अशा चालत्या-बोलत्या ज्ञान देणाऱ्या, प्रेम करणाऱ्या, शिकवणाऱ्या आजी आजोबांची खूप जास्त गरज आहे. धावपळीच्या या युगात आई-बाबा दोघेही नोकरी करणारे त्यांच्याकडे मुलांसाठी वेळ कमीच असतो, किंवा ते मजबुरीने काढू शकत नाही अशावेळी मुलांना पाळणा घरात आणि आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवावे लागते.

मध्यंतरी एका वर्तमानपत्रात एक अतिशय हृदयद्रावक बातमी वाचली. एका शाळेने मुलांना सामाजिक कार्य समजावे यासाठी एका वृद्धाश्रमात नेले तिथे एका विद्यार्थिनीला तिचे आजी-आजोबा भेटले. यापूर्वी तिने कधीही न पाहिलेले तिचेच सख्खे आजी आजोबा. किती केविलवाणे दृश्‍य असेल ते असो. खरंच या कविता संग्रहातील कविता ऐकून अगदी अंधुक आठवणारे माझे आजोबा दिसले. रामरक्षा शिकवणारे, गोष्टी सांगताना कधी कधी मुद्दाम झोपेचे सोंग करणारे, गमती जमती करणारे, हातात रामनामाची जप माळा घेऊन बसलेले, बसल्या बसल्या आजीला गमतीने चिडवणारे आणि एक दिवस बोलता बोलता सहज आमच्यातून निघून गेलेले. मोठ्या भावंडाकडून आजही त्यांच्याबद्दल ऐकताना गहिवरून येते.

आजोबांच्या या आठवणी कायम सोबत राहतील असा हा कविता संग्रह आहे. कुठल्या तरी पानावर नक्कीच तुमचे आजोबा तुम्हाला भेटतील निश्‍चितच. यातील एक कविता मनाला फार भावली अतिशय हृदयस्पर्शी आहे. आजोबाचा लाडका नातू नुकत्याच वृद्धाश्रमातुन देवाघरी गेलेल्या आजोबांसाठी देवाकडे मागणे मागताना म्हणतोय की देवा, माझ्या आजोबाला परत पाठव. पण त्याच्या लक्षात येते की आजोबा परत आले तरी त्यांना पुन्हा वृद्धाश्रमातच राहावे लागेल. त्यापेक्षा आम्हा भावंडांनाच तिकडे बोलावून घे. प्रत्येक कविता निराळी. काही आवडतील काही कदाचित आवडणार नाहीत पण इतक्‍या कविता एकाच विषयावर लिहिणे खरेच कौतुकास्पद आहे. ज्यांना कोणाला आजी आजोबांबद्दल जिव्हाळा आहे त्यांना हा कविता संग्रह नक्कीच आवडेल.

– मनीषा संदीप 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)