ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्या तेजीत

मुंबई – काल जीएसटी परिषदेने विविध वस्तू आणि सेवावरील कर निश्‍चित केले आहेत. त्यामुळे आता जीएसटीची अंमलबजावणी निश्‍चित झाली आहे. त्यातच बऱ्याच ग्राहकोपयोगी वस्तूवरील कर कमी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या कंपन्याचा नफा वाढणार असल्यामुळे आज या क्षेत्रातील कंपन्या तेजीत होत्या. या क्षेत्राचा निर्देशांक आज 7 टक्‍क्‍यापर्यंत वाढला असल्याचे दिसून आले.
कर कमी लागणार असल्यामुळे साबन, तेल, पेस्टचे दर कमी होणार आहेत, टाटा कॉफी, कोलगेट पालमोलीव्ह, आयटीसी या कंपन्याचे शेअर आज वाढले. मारीको, ईमामी, एचयुएल आणि ब्रिटानिया या कंपन्याचे शेअरही आज खरेदी झाले.
सध्या ग्राहकोपयोगी वस्तूवर 22 ते 24 टक्के कर लावला जातो. मात्र आता जीएसटीत यावर केवळ 18 टक्के इतका कर लागणार आहे. डाबर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल दुग्गल यांनी जीएसटीचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की कर तर कमी झाले आहेतच त्याचबरोबर आम्हाला अनेक ठिकाणी कर भरावे लागणार नाहीत.
आज याच कारणामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक चांगलेच वाढले होते. मात्र नंतर नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांक पुन्हा कालच्या पातळीवर बंद झाले. मात्र ज्या कंपन्याना फायदा होणार आहे. त्यांचे शेअर आगामी काळात आकर्षक राहण्याची शक्‍यता आहे.
आज बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 30 अंकानी वाढून 30464 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1 अंकाने कमी होऊन 9427 अंकावर बंद झाला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 276 अंकानी वाढला आहे, तर निफ्टी 27 अंकानी वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यापासून निर्देशांक वाढत आहेत. किरकोळ आणि घाऊक दरावरील महागई कमी झाली आहे. काही बड्या कंपन्यानी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. मान्सून केरळात आगोदरचा आला आहे. जीएसटीचे सर्व काही वेळापत्रकाप्रमाणे चालू आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात गुंवणूकदरांनी चांगली खरेदी केली होती. आज छोट्या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ न झाल्यामुळे मिडकॅप 0.07 टक्‍क्‍यानी तर स्मॉल कॅप 0.17 टक्‍क्‍यानी कमी झाले. सेन्सेक्‍ससंबंधातील 30 पैकी 18 कंपन्याच्या शेअरच्या भावात आज घट झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)