ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्र विस्तारणार 

जीएसटीत कपात आणि क्रयशक्‍ती वाढल्यामुळे विक्री वाढणार 
 
नवी दिल्ली: जीएसटीच्या अंमलबजावणीने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेली बाजार अस्वस्थता संपुष्टात आली आहे. उलट जीएसटीमुळे एकूण बाजारप्रणालीत सक्रियता आणल्याचे सुपरिणाम आता दिसू लागले आहेत, असे मत निल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक समीर शुक्‍ला यांनी व्यक्‍त केले. 
नोटाबंदी आणि जीएसटीने व्यापारावर झालेले दुष्परिणाम सरत असल्याचे दिसून येत असून, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्राची (एफएमसीजी) 2018 सालात 12 ते 13 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. एप्रिल ते जून 2018 तिमाहीत या उद्योगक्षेत्राने 10.9 टक्‍के वृद्धीदर अनुभवला, तर आधीच्या काही तिमाहीत त्याला दोन अंकी वाढ गाठणेही अवघड बनले होते. 
ग्राहकांमधून वाढलेली मागणी तसेच ताज्या जीएसटी करकपातीच्या परिणामी अनेक वस्तूंच्या किमतीत झालेल्या घटीचा परिणाम जून तिमाहीत विक्री वाढण्यात दिसून आला असे निल्सन इंडियाने यासंबंधीच्या अहवालात म्हटले आहे. ग्राहकांनी खरेदीचा हात आखडता घेतला अशी बाजारात स्थिती होती. आता मात्र पुन्हा खरेदीला बहर आला असल्याचे दिसून येत आहे. 
येत्या काळात किमतीत घसरणीच्या दिशेने दिसणारा कोणताही बदल हा उपभोगाला चालना देणारा ठरेल. मात्र, महागाई दरातील वाढ ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रासाठी मारक ठरेल, असे शुक्‍ला यांनी स्पष्ट केले. 
धोरणात्मक बदलांच्या परिणामी ग्रामीण भारतातील मागणीवर मोठा विपरीत परिणाम साधला होता. त्यातही सरलेल्या जून तिमाहीत दमदारी उभारी दिसून आली आहे, असे या अहवालाचे निरीक्षण आहे. आता निश्‍चलनीकरणाच्या पूर्वीच्या स्थितीवर ग्रामीण बाजारपेठेतील मागणी पोहोचली असल्याचे अहवाल सांगतो. 
मॉल्स, सुपर मार्केट, हायपर मार्केट या आधुनिक पेठांचा ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या एकूण विक्रीतील वाटा अलीकडच्या तिमाहीत वाढून 10 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सूट-सवलतीचे दिवस/ सप्ताहांच्या आयोजनाने साधलेला हा परिणाम आहे. शिवाय, जीएसटीमुळे ब्रॅण्डेड आणि विनाब्रॅण्डच्या उत्पादनांच्या किमतीतील तफावत जवळपास संपुष्टात आल्याने ग्राहकांचा कल अर्थात ब्रॅण्डेड उत्पादनांकडे झुकला आहे. याचप्रमाणे नैसर्गिक असा शिक्का असलेल्या उत्पादनांनाही बिगर नैसर्गिक उत्पादनांच्या तुलनेत तीनपट अधिक मागणी आहे. नैसर्गिक उत्पादनांच्या निर्मितीचे क्षेत्र हे भारतीय कंपन्यांनीच व्यापले असून, त्यांचा बाजारहिस्सा 81 टक्‍क्‍यांच्या घरात आहे. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)