पुसेसावळीत बॅंक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांचा सत्कार
पुसेसावळी, दि. 15 (वार्ताहर) – पुसेसावळी परिसरातील ग्राहकांना बॅंकिंग क्षेत्रातील उत्तमोत्तम ग्राहकाभिमुख सेवा सुविधा देण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही बॅंक ऑफ इंडिया पुसेसावळीचे वरिष्ठ शाखा प्रबंधक किशोर बागडे यांनी दिली.
पुसेसावळीत नवीन दोन ग्राहक सेवा केंद्रांचा शुभारंभ तसेच सुट्टीच्या दिवशीही लोकांना बॅंकिंग सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल गोरेगाव व पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने बॅंक ऑफ इंडिया पुसेसावळी शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कर्ज प्रबंधक आशिष भिसे, कृषी अधिकारी गिरीश तळेले, यशवंत वर्मा,महेश गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुसेसावळी परिसरातील पंधरा वीस गावात बॅंक ऑफ इंडियाची एकमेव शाखा असल्यामुळे बॅंकेमध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे ग्राहकांच्या वेळेत बचत व्हावी व तत्पर सेवा मिळावी तसेच शहराप्रमाणे पुसेसावळी व परिसरातील ग्राहकांना बॅंकिंग सेवेचा फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे किशोर बागडे यांनी सांगितले. तसेच ग्राहकांनी आपली कर्ज वेळेत परतफेड करुन सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी कर्ज प्रबंधक आशिष भिसे यांनी बॅंकेच्या विविध कर्ज योजना, शासकीय योजनाबद्दल माहिती दिली व जास्तीत जास्त लोकांनी फायदा घेण्याचे आवाहन केले. कृषी अधिकारी गिरीश तळेले यांनी कृषी विषयक योजना तसेच कर्जमाफी बद्दल योग्य मार्गदर्शन करून सविस्तर माहिती दिली.
ग्राहकांनी बॅंकेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास सागर ताहीलरामाणी, सतीश भेंडारकर, अशोक नवगान, हणमंत कांबळे, साधना पवार, सुरक्षा अधिकारी घार्गे, विजय सावंत, श्रीकांत पिसाळ, दिपक शिंदे, बजरंग माने व ग्राहकांची उपस्थिती होती.