ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक पंचायत प्रयत्नशील

फलटण - दीपप्रज्वलन करताना प्रांताधिकारी संतोष जाधव शेजारी डॉ. विजय लाड, विजय पाटील, डॉ. प्रसाद जोशी, सुनिता राजेघाटगे, केदार नाईक व अन्य.

डॉ. विजय लाड : फलटणला ग्राहक संरक्षण व महिला आरोग्य मेळावा

फलटण,दि. 5 (प्रतिनिधी) – फसव्या जाहिराती, बाजारातील फसवणूक, वजनमापातील लुबाडणूक किंवा कोणत्याही खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक पंचायत प्रयत्नशील आहे. विकृत व फसव्या जाहिरातीद्वारे आजही ग्राहकाची फसवणूक होत आहे. त्यामुळे ग्राहक पंचायतीला सक्षम व सुजाण ग्राहक घडवण्याचे काम करावे लागणार असल्याचे प्रतिपादन डॉ. विजय लाड यांनी केले.
फलटण येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि जोशी हॉस्पिटल, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक संरक्षण व महिला आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष सुनिता राजेघाटगे, केदार नाईक, डॉ. प्रसाद जोशी, किसनराव भोसले, मेजर डॉ. मोहन घनवट, किरण बोळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. लाड म्हणाले, पशूपक्षांचे डोळे जन्मानंतर ठराविक कालावधीत उघडतात. परंतु, माणसाचे डोळे आयुष्यभर उघडत नाहीत. ते उघडून सुजाण आणि सक्षम ग्राहक शक्ती उभी करण्याचा प्रयत्न ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकतिर्थ स्व. बिंदूमाधव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 40-45 वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी केवळ 42 कलमांचा सुटसुटीत, सोपा सरळ ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आणण्यात आला. त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कक्ष आणि ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून हे काम अधिक गतिमान करण्यात येत असल्याचे डॉ. विजय लाड यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रांताधिकारी संतोष जाधव म्हणाले, ग्राहकांनीही खरेदी करताना त्याची पावती घेतली पाहिजे. त्याचबरोबर चौकस बुध्दीने आपली खरेदी योग्यप्रकारे करण्याची आवश्‍यता आहे.
तहसीलदार विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मेजर डॉ. मोहन घनवट यांनी सर्व प्रास्तविक केले. किरण बोळे यांनी ग्राहक पंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जोशी हॉस्पिटलच्यावतीने जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त डॉ. प्रसाद जोशी यांनी मार्गदर्शन केले.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)