ग्राहकराजा… सावध राहा!

गेल्या काही दिवसांपासून इ-कॉमर्सवर ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. काही महिन्यांपूर्वी एका ग्राहकाला पार्सलमधून मोबाईलऐवजी साबण हाती पडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आठ ते दहा हजार रुपये मोजून खरेदी ऑर्डर दिलेल्या मोबाईलऐवजी साबण पाहून त्याचे डोके फिरले नसेल तर नवलचं. म्हणूनच प्रसिद्ध कंपन्यांचे निर्माते हे ग्राहकांना नेहमीच बनावट उत्पादनापासून सावध राहण्याचा सल्ला देत आहेत.

पारंपारिक बाजारात ग्राहक एखाद्या वस्तूंची पारख झाल्याशिवाय त्याची खरेदी करत नाही. तसेच खराब, बनावट वस्तूंची गुणवत्ता पाहूनच त्यात लगेच बदलही करता येतो. इंटरनेटवर वाढलेल्या इ-कॉमर्सच्या बाजारात अशा प्रकारची सवलत खूपच कमी असते आणि संकेतस्थळावर सामान बदलण्याची हमी देखील मर्यादित असते. अशा स्थितीत गुणवत्ताहिन, बनावट वस्तूंची विक्रीची शक्‍यता बळावली जाते.

लोकल सर्किल्स नावाच्या संस्थेने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार ई-कॉमर्सच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक पाचपैकी एक वस्तू बनावट असल्याचे सिद्ध होत आहे. जर एखादी वस्तू सौंदर्य प्रसाधन,अत्तर, सुगंधी द्रव्य आदी श्रेणीतील असेल तर याची शक्‍यता अधिकच बळावते. सर्व्हेक्षणानुसार ई-कॉमर्सच्या बहुतांश संकेतस्थळावर 20 ते 37 टक्के बनावट उत्पादन विकले जात आहे. उत्सवाच्या काळात ई-कॉमर्स संकेतस्थळांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केल्या. या वातावरणात फसवल्या जाणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढली आहे. अर्थात कंपनीची विश्‍वासर्हता राहण्यासाठी आणि ग्राहक टिकवण्यासाठी मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या सावधगिरी बाळगतात, मात्र त्यांनी केलेले उपाय पुरेसे ठरत नाहीत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे ई-कॉमर्सचा वाढलेला बाजार. ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारात ग्राहकांनी जागरूक राहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. अशा व्यवस्थेशिवाय असलेल्या बाजारात एकच समाधानाची बाब म्हणजे कंपन्यांकडून स्वत:हून घेतली जाणारी काळजी होय. वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी ई-कॉमर्सवर सक्रिय कंपन्या या बनावट वस्तूंच्या विक्रीवर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंटरनेट, स्मार्ट फोन, डिजिटल व्यवहार या सुविधांमुळे ई-कॉमर्सचा पसारा वाढत चालला आहे. आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी वाढवण्यास इ-कॉमर्सचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. देशात इ-कॉमर्सच्या बाजाराचा आकार हा 2017 मध्ये 38 अब्ज डॉलरवरून 2020 पर्यंत 64 अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. हाच बाजार दरवर्षी 51 टक्‍क्‍याने वाढत चालला आहे. वाढीचे हे प्रमाण अन्य देशांपेक्षा अधिक आहे. म्हणूनच व्यापक बाजारातील आपली प्रतिमा खराब होणार नाही, याची काळजी इ-कॉमर्स कंपन्या घेत आहेत. ग्राहकांनी देखील अधिक सवलती देणाऱ्या वस्तूंच्या खरेदीपासून सावध राहणे गरजेचे आहे. याबरोबरच संबंधित सरकारी यंत्रणांनीही देखरेखीबरोबरच तक्रारीचे निवारण करण्याप्रती गंभीर असायला हवे.

– सूर्यकांत पाठक (कार्याध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)