ग्रामीण शिक्षकांची आगळी शिकवण!

    प्रेरणा

दत्तात्रय आंबुलकर

राज्याच्या नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा गावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी आपल्या पुढाकाराने व प्रयत्नांनी गावच्या शाळेत लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहे. अशाच प्रकारचे लक्षणीय बदल मराठवाडा विभागातील विभिन्न ठिकामच्या जिल्हा परिषद संचालित शाळांमध्ये घडून आले आहेत. हे विशेष.

मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परगणा जोगेश्‍वरी या आष्टी तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्राच्या दरम्यान शाळा सोडून जाण्याचे प्रयत्न सतत वाढत असल्याने ती बाब सगळ्यांनाच काळजीची वाटत होती. शाळेतील एक शिक्षक सोमनाथ वाळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयावर मुळात विचार केला.

विद्यार्थी गळतीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी शाळेत अनियमीत येणारे विद्यार्थी व शिक्षण आणि शिक्षक यांच्याविषयी रुची नसल्याने शाळेत न येणारे वा शिक्षण सोडून देणारे अशी त्यांची वर्गवारी करून त्यानुसार प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नात विद्यार्थ्यांच्या जोडीलाच त्यांच्या पालकांशी पण संवाद साधण्यात आला. या संवादाद्वारे प्रसंगी पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण झाली. शिक्षणाच्या जोडीलाच शाळेतील विद्यार्थ्यां साठी स्टुडिओ निर्माण केला.

शाळेतीलच संगणकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे विचार, गाणी, गोष्टी, प्रासंगिक भाषणे यांचा संग्रह करण्यात येऊन विशेष प्रसंगी त्यांचे सादरीकरण केले जाऊ लागले. शालेय अभ्यासक्रमांशिवाय या उपक्रमांना विद्यार्थ्यांची खूपच पसंती लाभली व ते शाळेत नियमीत येऊ लागले. पालकांना पण ही बाब भावली व अशा प्रकारे परगणा-जोगेश्‍वरी गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाणे नियंत्रित झाले.

नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा गावच्या जिल्हा परिषद शाळांत पण विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही बाब नित्याची झाली होती. मात्र, याच शाळेतील स्वामी प्रभाकर, नरसिंग वाघमारे व शिवम गणाचार्य यांनी हे आव्हान स्वीकारून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या शिक्षकांच्या प्रामुख्याने असे लक्षात आले की शाळेत मुलभूत सादन-सुविधांचीच वानवा आहे. शाळेची इमारत दुर्लक्षित राहिल्याने या गैरसोईंमध्ये भर तर पडतेच, शिवाय याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांना अशा शाळेत येणेच नकोसे होते. या साऱ्या समस्यांवर जिल्हा परिषदेच्या शासन दरबारी दाद मिळत नसल्याने अखेरचा व परिणामकारक उपाय म्हणून हिप्परगा गावच्या शालेय शिक्षकांनीच याप्रकरणी पुढाकार घेतला.

गावच्या शिक्षकांनी 35000 रुपयाचा निधी परस्पर योगदानाद्वारे एकत्रित केला. त्याला जोड मिळाली ती ग्रामपंचायतीच्या 1,30,000 रुपये. या एकत्रित राशीने गरजेनुसार व प्राधान्य तत्त्वावर शाळेच्या वर्ग खोल्यांना फरशा बसविण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता सोयीने वर्गात बसता येते. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शालेय उपस्थिती व शिक्षणावर पण झाला.

पालकांना पण गावच्या शाळेतील या सुधारणा आवडल्या व आज हिप्परगा गावचे पालक आपल्या मुलांच्या गृहपाठापासून त्यांचा अभ्यास- परीक्षा इ. संस्थांबाबत अधिक दक्ष आणि सक्रिय झाले असून शाळा आणि शिक्षकांच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचे सक्रिय सहकार्य लाभत आहे. अशाच प्रकारचा यशस्वी प्रयोग बीड जिल्ह्यातील पाटोडा येथील जिल्हा परिषदशाळेतील एक कल्पक शिक्षक जगन्नाथ भगत यांनी केला आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक चाचणी घेण्यासाठी दिलेल्या प्रश्‍नांची “कौन बनेगा’ च्या धरतीवर प्रत्येक प्रश्‍नासाठी चार संभाव्य उत्तरे देऊन अचूक उत्तर शोधण्यास प्रोत्साहित करून त्यानुसार विद्यार्थ्यांचे आकलन करतात.

यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रश्‍नांची अचूक उत्तरे देण्याच्या जोडीलाच त्यांच्यातील चौकस-चोखंदळपणाला पण प्रोत्साहन मिळून त्याचा परिणाम या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर पण झालेला दिसून येतो. सुरगणच्या जिल्हा परिषद शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांची दप्तरे-पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर्स दिले आहेत. यामुळे दूरवरून व पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ओझे कमी झाले तर हिंगोलीच्या शिरड-शहापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षक रफीक अन्सारी यांनी विद्यार्थ्यांसाठी उर्दूतून माहितीपूर्ण व शैक्षणिक ऍपची निर्मिती व अंमलबजावणी केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनपर शिक्षणाचे नवे दालन उपलब्ध झाले आहे.

ग्रामीण भागात व विशेषतः जिल्हा परिषद शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांना शिकवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जिद्द पाहिली व त्याचे यश लक्षात घेतले म्हणजे त्यांच्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाला मनोमन सलाम कावासा वाटतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)