महिलांच्या विचारात स्मार्टपणा आला पाहिजे

राजगुरूनगरात दिवाणी न्यायाधीश पाटील यांचे मत

राजगुरुनगर- समाजात अजूनही मुलगा मुलगी हा भेद केला जातो आहे. आधुनिक काळात महिला जशा स्मार्ट झाल्या आहेत. तसाच त्यांच्या विचारातही स्मार्टपणा आला पाहिजे. तरच स्त्री भ्रूण हत्या थांबतील, असे मत राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश के. एच. पाटील यांनी व्यक्‍त केले.
खेड तालुका विधी सेवा समिती, खेड बार असोशिएशन, खेड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने खेड पंचायत समितीच्या सभागृहात महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश जी. बी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश एन. आर. लेंभे, सरकारी वकील रजनी नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखी, पुणे जिल्हा बार ऍडव्होकेट्‌स बार असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष ऍड. दिलीप करंडे, तालुका बार असोशिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा भोगाडे, ज्येष्ठ विधीतज्ञ पोपटराव तांबे, संदीप घुले, विठ्ठल नाणेकर, माणिक वायाळ, पंचायत समितीचे अधीक्षक रमेश इष्टे, विधी सेवा समितीचे समन्वयक महादेव कनकुरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
न्यायाधीश जी. बी. देशमुख म्हणाले की, विधी सेवा समितीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांना विविध लाभ दिले जातात. जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ देता यावा यासाठी खेड न्यायालयात कक्ष उभारण्यात आला आहे. त्यावर तीन अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असून सर्व प्रकारच्या योजनाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, सूत्रसंचालन शुभम गाडगे तर गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी आभार मानले.

  • समाजात अजूनही काही महिला दुर्लक्षित व हलाखीचे जीवन जगत आहेत. यासाठी पुढे गेलेल्या महिलांनी त्यांना मदत करणे काळाची गरज आहे. आपले कर्तृत्व करताना दुर्लक्षित महिलांचा विचार केला पाहिजे. एका महिलेने कमीत कमी दोन महिलांना घडवले पाहिजे. संसार करताना स्वताच्या आरोग्याकडे आवडी निवडीकडे लक्ष दिले पाहिजे स्वतः जगायला शिकले पाहिजे.
    – रजनी नाईक, सरकारी वकील
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)