ग्रामस्थांच्या सहभागामुळे “हायटेक सिटी’ उभी राहणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : महाळुंगे-माण टीपी स्किम शुभारंभ

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून साकारणारा महाळुंगे-माण हायटेक सिटी प्रकल्प हा भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहात आहे. या प्रकल्पामुळे एक मोठे अर्थकारण उभे राहणार असून ग्रामस्थांच्या सकारात्मक सहभागामुळे ते विकासाच्या समृद्धीचे नवे मॉडेल म्हणून ओळखले जाईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाळुंगे-माण येथील हायटेक सिटीचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आमदार संग्राम थोपटे, बाबुराव पाचर्णे, मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, नगररचना विभागाचे संचालक नागेश्‍वर शेंडे आदी उपस्थित होते. यावेळी पीएमआरडीएच्या महाळुंगे-माण हायटेक सिटीच्या बोधचिन्हाचे आणि डिजीटल फलकाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंजवडी हे पुण्याचे ग्रोथ इंजिन आहे. त्याप्रमाणेच महाळुंगे-माण हायटेक सिटी प्रकल्पाचे पुणे शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान राहणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशभरात होणार आहे. मुंबई आणि परिसराचा विकास एमएमआरडीएच्या माध्यमातून झाला, त्याच धर्तीवर पीएमआरडीएच्या माध्यमातून पुणे परिसराचा विकास होणार आहे. पीएमआरडीएच्या विविध प्रकल्पांमधून पुण्याच्या नागरिकीकरणाला योग्य दिशा मिळणार आहे. यासाठी नागरी विकासासाठी जगभर प्रसिद्ध असणाऱ्या सिंगापूरच्या सरकारी कंपनीशी आपण करार केला आहे. पुढील 40 ते 50 वर्षांचा कालावधी विचारात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसराचा कायापालट होत आहे. पुणे शहराचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. महाळुंगे-माण हायटेक सिटी हा प्रकल्प देशात आदर्श ठरेल.

शहराला मुळशीचे पाणी मिळावे
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 30 टीएमसी पाणी आहे. त्यातील 20 टीएमसी पाणी शहरासाठी वापरले जाते. तर अवघे 10 टीएमसी पाणी शेतीला मिळते. त्यामुळे मुळशी धरणातील पाणी शहरासाठी मिळावे, अशी मागणी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

रिंगरोडचे काम डिसेंबरपासून
पुण्याच्या नियोजनबद्ध वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील 32 किलोमीटरचे काम पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. दक्षिण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रिंगरोड अत्यंत महत्त्वाचा आहे. रिंगरोडसाठी आवश्‍यक असणारी जमीन राज्य शासन अधिग्रहित करून देईल. तर केंद्र सरकार रस्ते बांधणीसाठीचा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलला, कल्पक नेता, उच्च पातळीवरील नेता, अशा शब्दांत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. आपल्या संपूर्ण भाषणात शिवतारे हे फडणवीस यांचे फक्त कौतुकच करत होते. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत कशी आहे, याचे उदाहरण देत “आपण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली पुढे जाऊ’ असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)