ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात नाराजी

उंब्रज : बदलीचा ठराव करूनही बदली होत नसल्याचे ग्रामपंचायत सदस्यांचे म्हणणे

उंब्रज – येथील ग्रामपंचायतीच्या बुधवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवक पवार यांच्या मनमानी कारभारावरून ग्रामस्थ व सत्ताधारी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आजपर्यंतच्या झालेल्या ग्रामसभामधील एकही ठराव अंमलात आणला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला. ग्रामसेवकाच्या बदलीबाबत अनेकवेळा ठराव करून त्याबाबतचे लेखी निवेदन देवूनही बदली होत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी करत नाराजी व्यक्त केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लता कांबळे होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कराड तालुक्‍यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून उंब्रज ग्रामपंचायतीला ओळखले जाते. बुधवारी झालेली ग्रामसभा ग्रामसेवक बदली, अनाधिकृत इमारतीच्या नोंदी, बांधकामे, शाळांचे प्रश्न, चौदा वित्त आयोगातून येणाऱ्या निधीचा वापर, रेशनिंग, आरोग्यसुविधा अशा विविध मुद्यांवर वादळी ठरली.

ग्रामसभेच्या सुरूवातीलाच सात महिने ग्रामसभा का झाली नाही तसेच आजपर्यंत झालेल्या ग्रामसभा मधील एकही ठराव अंमलात का आणला गेला नाही असे अनेक प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केले. त्याचबरोबर सभेचे व्हिडीओ शुटिंग करण्याची मागणी केली. ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू असल्याची टीका करत नोंदीमध्ये आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप करुन चौकशीची मागणी केली. ग्रामसेवकाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. यावर उपसरपंच अजित जाधव व ग्रामपंचायत सदस्य विजयराव जाधव यांनी ग्रामसेवक आमचे ऐकत नसल्याचे सांगितले.

विजय जाधव म्हणाले, यापूर्वीच ग्रामसेवक बदलीचा ठराव दिला आहे परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उंब्रजमध्ये बेकायदा बांधकाम बांधणे व विक्री करण्याचा व्यवसाय फोफावला असून कारवाई करण्याची यावेळी मागणी केली. टि. पी. सॅंक्‍शनची परवानगी नसताना अनाधिकृतपणे बांधण्यात आलेल्या काही अपार्टमेंटमधील फ्लॅटला 8 अ चे उतारे ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेच कसे? यावरूनही ग्रामसेवक आर. टी. पवार यांच्यावर टिका झाली. त्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप उपसरपंच पै. अजित जाधव यांच्यासह काही ग्रामस्थांनी केला.

प्रोसिडिंग वाचन ग्रामविकास अधिकारी आर. टी. पवार करत असताना मागील सभेत झालेल्या ठरावापैकी कोणतीही कामे झाली नसल्याचे सांगून सद्य परिस्थितीला उंब्रज येथील काही अनाधिकृत अपार्टमेंट विरोधात अर्ज दाखल केले असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी दिली. काही इमारतींना टी. पी. परवानगी न घेता बांधल्या गेल्या असून काही फ्लॅटचे बोगस उतारे दिले आहेत, याची चौकशी व्हावी तसेच अनाधिकृत इमारतीच्या नोंदी केल्यास उताऱ्यावर अनाधिकृत बांधकाम अशी नोंद करुन करवसूली करावी, अशी मागणी केली.

महाविद्यालयीन रस्त्यावरील गाळ्यांचा महसूल गोळा करण्याची मागणी त्यांनी केली. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने अनाधिकृत गाळे बंद करण्याचा ठराव घेतला असताना ग्रामविकास अधिकारी पवार यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे सांगून सदर प्रकरणाची चौकशीची मागणी उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी केली. अनाधिकृत बांधकामाला ग्रामपंचायत प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून वरिष्ठांनी याबाबत चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी ग्रामसभेला हजर राहत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला. ग्रामसभेस उपसरपंच अजित जाधव, सदस्य विजयराव जाधव, जयवंत जाधव, विनायक जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत निकम, वैद्यकीय अधिकारी संजय कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)