ग्रामसभेत विष प्राशनाचा महिलेचा प्रयत्न

वाघोली- गायरान जागेमध्ये केलेले बांधकाम ग्रामपंचायतीने पाडल्याचा राग व्यक्त करीत गायरान जमीनीवरील अन्य इतर अतिक्रमणेही पाडण्याची मागणी करीत विष प्राशन करण्याचा प्रयत्न वाघोलीतील एका महीलेने भर ग्रामसभेमध्ये केला. महिलेच्या जवळच उभे असलेल्या पोलिस व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत महीलेच्या हातातील विषाची बाटली काढून घेतल्याने अनर्थ टळला. ग्रामपंचायतीने चौकशीसह अतिक्रमणे काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ही महिला शांत झाली.
नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत कार्यकारीणीची पहीलीच ग्रामसभा असल्याने ग्रामपंचायत वाद व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभा सुरु होण्यापुर्वी माजी सरपंच आनंदराव शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शेतकरी धर्मा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान वाघमारे व गावातील मृत नागरीकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस ग्रामस्थांसह सर्व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला करपटटीचा विषय घेण्यात आल्यानंतर ग्रामविकासासाठी निधी कमी पडत असल्याने सरपंच व उपसरपंचानी ग्रामस्थांना करपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले, त्याचप्रमाणे थकबाकीदारांना नोटीसा दिल्या असून पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनधिकृत नळ व नळांना मोटारी लावणाजयांवर कारवाई केली जाणार आहे.
गायरान जागेवरील अतिक्रमणांचा मुद्दा समोर आल्यानंतर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईची पत्रे पाठविली असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमणांवर चौकशी करुन कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे यापुढे अतिक्रमण होवू देणार नसल्याचे आश्वासन सरपंच उबाळे यांनी सांगितले. अतिक्रमणांच्या मुद्दयामध्येच ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यात आलेल्या रुक्‍मिणी गोरे याच्या बांधकामावरील कारवाईचा जाब गोरे यांनी विचारला. इतरांवर कारवाई न करता हेतुपुरस्सर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत गोरे यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. शेजारीच उभे असलेल्या पोलिस व ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत गोरे यांना शांत केले व चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबतच्या विषयावर चर्चा करताना ग्रामपंचायत या विषयावर गांभीर्याने विचार करीत असून वाघोली येथे कचरा प्रक्रीया प्रकल्प उभे करण्यासाठी बेंगलोर येथे एका प्रकल्पाची पाहणी केली जाणार असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले. कचऱ्याच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी आठवड्यातून एकदा ग्रामस्वच्छता राबविण्याची संकल्पना उपसरपंच रामकृष्ण सातव यांनी मांडली. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांना नोटीसा देवून कारवाई करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.
सांडपाणी व्यवस्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शासनाच्या नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत वाघोली गावाची आयआयटीच्या विद्यार्थ्यांकडून सांडपाणी व्यवस्थापनाची आखणी केली जावून पुढील कार्यवाही होणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामसभेसाठी विविध आलेल्या अर्जांचे वाचन करुन चर्चा करण्यात आली.

  • अपंगांसाठी 50 हजार मर्यादा…
    ग्रामपंचायतीचा 3 टक्के निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येतो. मागील ग्रामसभेच्या ठरावानुसार प्रत्येकी 25 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचे ठरविण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये 25 हजारांची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. 156 अपंगांची नोंद असलेल्या पात्र अपंगांना वैयक्तिक लाभ यापुढे खात्यावर जमा केला जाणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)