ग्रामविकासामधील नवदुर्गा…!!! (प्रभात ब्लॉग)

भारतीय संस्कृतीने आदीकाळापासूनच स्त्रीची पूजा केली आहे. घराचं पावित्र्य राखण्याचे कामसुद्धा एक स्त्रीच करत असते. हिंदू संस्कृतीत यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि याच देविरुपांना वेगवेगळ्या पद्धतीने पूजिले जाते. नवदुर्गा उत्सव अथवा नवरात्री हा त्यापैकीच एक. नवदुर्गांच्या नऊ रुपांची शक्तीपूजा करण्याचा काळ म्हणजे नवरात्री उत्सव.

ग्रामविकासासाठी काम करताना लोणी ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत अशाच नवदुर्गांची ओळख लोणी, वर्धा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला झाली. ज्यांनी आपल्या कामाने त्यांचे आयुष्य तेजोमय बनविले. सौ.अरुणा झिंगरे, सौ.शुभांगी कोल्हे, सौ. उषा रामटेके, सौ. सुनीता नेहारे, सौ. प्रिया रामटेके, सौ. अमृता कासार, सौ. सुनीता पिंपळकार, सौ. माधुरी भोयर, सौ. संगीता काटोके या प्रज्ञेशा लाईट्स हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळणाऱ्या नवदुर्गा.

-Ads-

प्रज्ञा ग्रामसेवा संघाचे लेखेजोखे सांभाळणाऱ्या अरुणा झिंगरे यांच्या घरी परंपरागत व्यवसाय आहे. शेती काहीच नाही त्यामुळे निश्चित उत्पन्नाची शास्वती काहीच नाही. अशातच प्रज्ञेशा लाईट्स हा व्यावसायिक गट बनविण्यात आला, ज्यामध्ये महिलांकडून गावात LED लाईट्स बनविण्याचे काम सुरू झाले. अरुणा झिंगरे यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. त्यांचा मुलगा जे शिक्षण महाविद्यालयात घेतो तेच शिक्षण आम्ही महिला अगदी लीलया करू शकतो, हा विचार त्यांच्या मनात आला. परंपरागत वाट सोडून महिलांनी तांत्रिक दृष्ट्या समजला जाणारा हा व्यवसाय सुरू करणे हीच मुळात मोठं यश होतं. आज मार्च 2018 महिन्यात सुरू झालेल्या या व्यवसायाने लाखोंची उड्डाणे केली आहेत.

शुभांगी कोल्हे आजपर्यंत कधीही व्यवसायासाठी घराबाहेर पडल्या नव्हत्या. परंतु प्रज्ञेशा लाईट्सच्या माध्यमातून स्वयंसिद्ध महोत्सव, नागपूर, वर्धा कृषी प्रदर्शनी, महिंद्रा महोत्सव नागपूर, याठिकाणी जाऊन प्रतिनिधित्व तसेच विक्री केली. प्रज्ञेशा लाईट्स या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार तर मिळालाच आहे, परंतु एक स्त्री म्हणून इतरांना आदर्शवत असं उदाहरण निर्माण झालं आहे. या सर्व नवदुर्गांमुळे इतर महिलांमध्ये सुद्धा विश्वास आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झालं आहे.

उषा रामटेके ज्या मार्केटिंगची जबाबदारी सांभाळतात, ग्रामसंघच्या CRP म्हणून त्या काम करतात. आजपर्यंत गावातील महिलांना एवढे महत्व दिले जात नव्हते, परंतु या व्यवसायामुळे गावामध्ये इतर संस्थांच्या लोकांच्या भेटी वाढल्या, त्यामुळे गावासोबतच इतर लोकांकडूनही त्यांना महत्व प्राप्त झाले. अवघ्या 1.7 लाख रुपयात सुरू केलेल्या या व्यवसायाने आज 17 लाख रुपयांच्या उलढालीकडे वाटचाल केली आहे.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत ग्रामपंचायत लोणी,तालुका देवळी,जिल्हा वर्धा येथे फेब्रुवारी-2018 मध्ये ‘प्रज्ञेशा लाईट्स’ हा उपजीविकेसाठी महिला बचत गटाकडून व्यवसाय सुरु झाला. अभियानाच्या माध्यमातून 14 घरांना थेट लाभ मिळून या नवदुर्गांनी गावालासुद्धा विकासाच्या महत्वाच्या टप्प्यावर नेऊन ठेवले आहे. अभियानाच्या माध्यमातून या महिलांचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढून आज खऱ्या अर्थाने इतरांसाठी त्या प्रेरणेचा अखंड स्रोत ठरत आहेत. परिणामी ग्रामविकासाचा अखंड दीप याच नवदुर्गांच्या माध्यमातून उजळत राहत आहे आणि तो असाच उजळत राहील अशीच या नवरात्री निमित्त देवी शारदाचरणी प्रार्थना.

– अतुल राऊत, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक
(लेखक वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुका मधील लोणी या गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक म्हणून कार्यरत आहेत.)

What is your reaction?
350 :thumbsup:
110 :heart:
4 :joy:
194 :heart_eyes:
167 :blush:
1 :cry:
30 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)