ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राची चर्चा…

नगर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची नावे कार्यक्रम पत्रीकेत होती. खासदार दिलीप गांधी यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नव्हते तर ना. पंकजा मुंडे यांना टाळून आयोजकांनी मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम घेतल्याने मुंडे कार्यक्रमाला येणारच नाहीत, असे मुंडे समर्थक अगोदरपासूनच ठामपणे सांगत होते. त्यातच ऍड. प्रताप ढाकणे यांनी काही दिवसापूर्वी निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने त्यांच्याकडे नगर दक्षिण मतदार संघाचे उमेदवार म्हणून पाहिले जाते.

ऍड. ढाकणे सचिव असलेल्या एकलव्य शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या बबनराव ढाकणे जीवनगौरव समारंभाच्या खाजगी कार्यक्रमाकडे ऍड. ढाकणे यांची भविष्यातील राजकीय नांदी म्हणून पाहिले गेले. यासर्व घडामोडींत ना. मुंडेंना व खा. गांधींना टाळून मुख्यमंत्री कार्यक्रमाला येतील काय? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात होता. ऍड. प्रताप ढाकणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने मैत्रीचे संबंध आहेत. मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे प्रमुख असतात त्यांना राजकीय पक्ष नसतो. त्यामुळे एकलव्य शिक्षण संस्थेच्या खाजगी कार्यक्रमाला मुख्यमंत्री नक्की येथील अशी आयोजकांना खात्री होती. त्यात फडणवीस मुंबईवरून विमानाने औरंगाबादला व मोटारीने पाथर्डीला असा शासकीय दौरा शनिवारी रात्री आला अन्‌ मुख्यमंत्री येतीलच यावर शिक्कामोर्तब झाले.

आयोजकांसह प्रशासनानेही गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेली कार्यक्रमाची व मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची तयारी पूर्ण केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तीन-चार दिवसापासून शहरात तळ ठोकून होता. आज रविवारी सकाळी शहराला पोलिसांनी वेढल्याने पोलीस छावणीचे रूप आले होते. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री नागपूर येथे रामनवमीनिमित्त आरएसएसच्या कार्यक्रमाला गेल्याने पाथर्डीचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कार्यक्रम पत्रिकेत असलेल्या नावापैकी एकही भाजपचा नेता कार्यक्रमाकडे फिरकला नसल्याने पंकजा मुंडे यांच्या दबावतंत्राला मुख्यमंत्र्यासह इतर भाजप नेते झुकल्याची चर्चा तालुक्‍यात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)