ग्रामपंचायत कर्मचारी किमान नाही कमाल वेतनास पात्र

नारायणगाव : या देशाचा, या राज्याचा पहिला महत्त्वाचा घटक हा ग्रामपंचायत कर्मचारी आहे, प्रत्येक ग्रामपंचायत ही त्या गावची संसद आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची किमान वेतनाची मागणी आहे; पण ग्रामपंचायत कर्मचारी हे किमान वेतन नाही तर कमाल वेतनास पात्र असून किमान वेतनापेक्षा कमाल वेतनावर त्यांनी बोलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कामगार किमान वेतन महामंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनअंतर्गत पुणे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी मेळाव्याचे ओझर (ता. जुन्नर) येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना रघुनाथ कुचिक बोलत होते. यावेळी जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, पुणे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष गणेश कवडे, ओझरच्या सरपंच अस्मिता कवडे, पंचायत समिती सदस्य शाम माळी, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, विशाल सोनवणे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास कुमरवार, कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काझी,सुजित बोऱ्हाडे, सरचिटणीस गिरीश दाभाडकर, सहचिटणीस प्रदीप पडवळ, कोषाध्यक्ष धनराज आंबटकर, दिलीप डिके,रामेश्वर गायके, महिला कर्मचारी उपाध्यक्षा सपना गवांडे, जुन्नर तालुका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन मुळे, कक्ष अधिकारी आर. सी. तळपे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कुचिक म्हणाले की, सध्याच्या काळात सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी कमीत कमी 17 ते 18 हजार रुपये प्रति महिना खर्च येत आहे. कामगार कायद्यातील 144 कायदे बदलले. किमान वेतनाची प्रचंड मोठी गरज आहे. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
यावेळी जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे म्हणाले की, काही गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून हीन दर्जाची वागणूक दिली जाते, ही दुर्दैवी बाब आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील न्याय मिळायला हवा. तळागाळातील कर्मचारी जर समाधानी आणि आनंदी असेल, तरच या राज्याची किंवा देशाची प्रगती होणार आहे. गाव पुढाऱ्यांपेक्षा ग्रामपंचायत कर्मचारी हा महत्त्वाचा आहे. अत्यंत अल्प पगारात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून अनेक कामं करून घेतली जातात. शिपायापासून ग्रामसेवकपर्यंतची सर्व कामं कर्मचाऱ्यांना करावी लागतात, ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची गळचेपी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पडवळ यांनी केले, सूत्रसंचालन अभंग यांनी केले, तर आभार तालुका सचिव रमजान पठाण यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)