ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती बांधून आंदोलन

प्रलंबित मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

कर्जत – तालुका सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाच्यावतीने वेतनश्रेणी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी 1 डिसेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाकडे पाठपुरावा करून ही कसलाच न्याय मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.

सार्वजनिक वाचनालयात काम करणारे, ग्रंथालयीन कर्मचारी गेल्या 50 वर्षांपासून न्याय्य मागण्यांसाठी प्रयत्नशील आहेत. दरमहा 18000 किमान वेतन, भविष्य निर्वाहनिधी तसेच आरोग्य विमा मिळावा या मागणीसाठी कर्मचारी संघर्ष करीत आहे. या प्रश्नावर त्यांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र शासनाकडून दाद दिली जात नाही. त्यामुळे कर्जत तालुक्‍यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काळ्या रंगाच्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

“ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना तीन ते चार हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. महागाईच्या काळात कर्मचारी निराशेच्या गर्तेत गेले आहेत. कर्मचाऱ्यांना अपुऱ्या वेतनामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण करता येत नाहीत. शासनाकडून कर्मचाऱ्यांची अवहेलना केली जात आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.
– शरद सोनवणे, तालुकाध्यक्ष, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ, कर्जत

वाचन संस्कृती वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहत ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या ग्रंथालय सेवकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत कर्जत तालुक्‍यातील सार्वजनिक वाचनालयात काम करणारे ग्रंथालयीन कर्मचारी सरकारच्या ग्रंथालयधोरणाच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करीत आहेत.

कर्मचाऱ्यांच्यावतीने तहसीलदार किरण सावंत पाटील तसेच प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी ग्रंथालयीन कर्मचारी समाधान पाटील, नानासाहेब साबळे, पांडुरंग डमरे, शिवाजी गायकवाड, बाळासाहेब चिंधे, उमेश अनभुले, संतोष शेटे, किशोर बटुळे, बाळकृष्ण खेडकर, शरद सोनवणे, बाळासाहेब रसाळ, उद्धव ठाणगे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)