ग्रंथालयांनी “ऑडिट रिपोर्ट’ 31 ऑक्‍टोबरपर्यंत द्यावा

अन्यथा अनुदानाचा दुसरा हप्ताच मिळणार नाही : श्रेया गोखले यांच्या सूचना

– डॉ. राजू गुरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पुणे जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्यासाठी येत्या 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत परिपूर्ण लेखापरीक्षण अहवाल सादर न करणाऱ्या ग्रंथालयांना जिल्हा ग्रंथालय कार्यालयांकडून अनुदानाचा दुसरा हप्ताच मिळणार नाही.

जिल्ह्याच्या विविध भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच वाचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी विविध सामाजिक संस्था, मंडळे, संघटना यांच्या मार्फत सार्वजनिक ग्रंथालये सुरू करण्यात आलेली आहेत. शासनाची मान्यता घेऊन ही ग्रंथालये सुरू करण्यात आली आहेत. ग्रंथाच्या संख्येनुसार त्यांच्या जिल्हा, तालुका व इतर अशा स्तरावर अ, ब, क, ड असा ग्रंथालयांचा दर्जाही ठरविण्यात आलेला आहे.

जिल्हा स्तरावरील “अ’ दर्जाच्या ग्रंथालयाला वार्षिक प्रत्येकी 7 लाख 20 हजार रुपये अनुदान वाटप होते. तर “ड’ स्तरावरील ग्रंथालयांना प्रत्येकी 30 हजारांपर्यंत अनुदान वाटप केले जाते. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या ग्रंथालयांनाच अनुदान वाटप होत असते. वर्षातून दोन वेळा 50 टक्के प्रमाणे अनुदान दिले जाते. अनुदानाचा पहिला हप्ता वाटप करताना 30 जूनपर्वी वार्षिक अहवाल सादर करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे. या अहवालांची पूर्तता करणाऱ्या ग्रंथालयांना ऑगस्ट अखेरपर्यंत पहिला हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

आता अनुदानाचा दुसरा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुदानाच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांना 31 ऑक्‍टोबरपर्यंत लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत अहवाल सादर न करणाऱ्या ग्रंथालयांना अनुदान वाटप होणार नाही, अशा सूचना जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी दिला आहे. लेखा परीक्षण अहवाल सादर झाल्यानंतर त्यांची सखोल तपासणी करण्यात येईल. काही त्रूटी असल्यास त्याची पूर्तता करून घेतली जाणार आहे. परिपूर्ण अहवाल असणाऱ्या ग्रंथालयांनाच अनुदान वाटप करण्यात येईल, असेही गोखले यांनी स्पष्ट केले आहे.

अशी आहे जिल्ह्यातील ग्रंथालयांची माहिती
पुणे जिल्ह्यात एकूण 496 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. ग्रामपंचायतीची 69 ग्रंथालये आहेत. “अ’ वर्गात 29, “ब’ वर्गात 79, “क’ वर्गात 213, “ड’ वर्गात 175 ग्रंथालये आहेत. तालुक्‍यांचा विचार करता आंबेगावमध्ये एकूण 23, इंदापूरमध्ये 78, खेडमध्ये 44, जुन्नरमध्ये 18, दौंडमध्ये 22, पुणे शहरात 90, पुरंदरमध्ये, 24, बारामतीत 45, भोरमध्ये 12, मावळमध्ये 14, मुळशीमध्ये 9, वेल्ह्यात 18, शिरुरमध्ये 32, हवेलीत 67 याप्रमाणे ग्रंथालये आहेत. पुण्यात सर्वाधिक ग्रंथालये आहेत. तर, मुळशीमध्ये सर्वात कमी ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांना त्यांच्या दर्जानुसार अनुदानाचा पहिला हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. आता मार्चमध्ये अनुदानाचा दुसरा हप्ता वाटप होणार आहे, असेही गोखले यांनी सांगितले. आकृतिबंधानुसार “अ’ वर्गातील ग्रंथालयांसाठी 118, “ब’ वर्गासाठी 237, “क’ वर्गाकरीता 426, “ड’ वर्गातील 175 असे एकूण 956 कर्मचारी कामकाजसाठी उपलब्ध आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)