गौराईसाठी हडपसर बाजारपेठेत महिलांची गर्दी

विविध साहित्यांनी बाजारपेठ सजली

फुरसुंगी – गणरायाच्या आगमनाबरोबर गौराईचेही आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गौराईच्या स्वागतासाठी उपनगर आणि लगतच्या गावात जोरदार तयारी सुरू आहे. लक्ष्मीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे स्वागत करण्यासाठी महिलावर्गांची तुळशीबाग, रविवार पेठ आणि हडपसरमध्ये खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. गौराईचे मुखवटे, दागदागिने, साड्या, मखरे साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतल्याचे चित्र दिसत आहे. नानाविध वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या दिसत आहे. त्यामुळे नवनव्या वस्तू पाहून महिलावर्ग खरेदी करण्यात मग्न झाला आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडीला वाव देत सजावटीच्या वस्तू दर्शनी भागात ठेवल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही वस्तू खरेदी करणे सोपे झाले आहे.

कोंढवा व हडपसरमधील किरकोळ दुकानदारांसह होलसेल दुकानदारांनीही यावर्षी सजावटीसाठी भारतीय बनावटीबरोबर चायनीज वस्तूही मोठ्या प्रमाणावर ठेवल्या आहेत. शहराबरोबर उपनगरामधील दुकानदारांनीही गौराईचे विविध प्रकारचे मुखवटे विक्रीसाठी आणले आहेत. त्यांच्या किमती साधारण शंभर रुपयांपासून पुढे आहेत. ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गौराईसाठी कुड्या, ठुशी, मंगळसूत्र, चपलाहार, बांगड्या, मोत्याच्या माळा, नथ, बुगडी, जोडवी अशा पारंपरिक आभूषणासह खास डिझायनर प्रकारच्या साड्याही उपलब्ध आहेत. याशिवाय गौराईसाठी आकर्षक मखर, तोरण, रांगोळ्यांचे विविध प्रकारचे छाप, थर्माकोलचे मोठे कमळ, सजवलेला चौरंग लक्ष वेधून घेत आहे.तसेच गौराईसाठी साडी ते मुखवट्यापर्यंतचा पूर्ण सेटही आता उपलब्ध आहे.
बाप्पांचे आगमन झाल्यानंतर उद्या गौराई घरोघरी दाखल होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महिलांची घराघरामध्ये लगबग सुरू झाली आहे. सणावाराचे दिवस म्हटले गोडधोड आलेच. गौराईला पहिल्या दिवशी मेथीची भाजी, भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी आणि लाडू, करंजी, चकली आणि विसर्जनाच्यादिवशी शेवयाचा भात, असा बेत असतो, असे महिलांनी सांगितले. गौरी – गणपतीचा सण प्रत्येक महाराष्ट्रातील माणसासाठी महत्त्वाचा असतो. आधी तर तयारीला महिनाही पुरत नव्हता. घरातील मंडळी या कामात गुंतलेली असायची. आता सजावट, सांगोळ्या, पकिंग, पक्‍वान्न सारे काही झटपट आणि झगमगणारे म्हणजे रेडी टू एन्जॉय हा टेंड लोकप्रिय झाला आहे, असे नोकरदार महिलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)