गौराईला निरोप देताना दाटली आसवे

पिंपरी – सोनपावलांनी आलेली दीड दिवसांची पाहुणी गौराईंना गुळाच्या कानवल्यांसह दहीभाताचा नैवेद्य दाखवून जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. घरांमध्ये समृध्दींचे वाण घेऊन आलेल्या ज्येष्ठा – कनिष्ठा गौरींचे सात दिवसांच्या बाप्पांसोबत विसर्जन करण्यात आले.

गौरींच्या आगमनाच्या तयारीसाठी आठवडाभर आधीपासून लगबग सुरू असलेली घरे त्यांच्या आगमनानंतर मांगल्याने भरून गेली होती. पहिल्या दिवशी साधा भाजी-भाकरीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी विधिवत पूजनासह पंचपक्वान्नांचा नैवेद्य असा या माहेरवाशिणींचा पाहुणचार केला गेला. तिसऱ्या दिवशी आज त्यांना गुळाच्या कानवल्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. आरती व पूजा करण्यात आली.

या तीन दिवसांमध्ये आपल्या सग्यासोयऱ्यांना आणि मित्रमंडळींना दर्शनाचे निमंत्रण देण्यात आले होते. बहुतांश कुटुंबांनी एकत्रितपणे आपल्या नातेवाईकांच्या घरी जाऊन गौरींचे दर्शन घेतले, तर आसपासच्या घरांमधील गौरींचे दर्शन करून हळदी-कुंकवाचा उपक्रम देखील उत्साहात पार पडला. रात्री गौरींच्या गळ्यातील दागदागिने काढून आणि मुखवटे उतरवून त्यांना निरोप देण्यात आला. घरोघरी वेगवेगळ्या पद्धतींनुसार गौरींना उत्साहपूर्ण वातावरणात निरोप दिला गेला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)