गोष्ट जादूगाराची…आणि खिचडीची

– अश्‍विनी महामुनी

जादूचे नाव घेतले, तरी मन नुसते हरखून जाते. लहानपणी तर जादूची मोठी ओढ असायची. घरात माझा मोठा भाऊ पत्त्याच्या जादू करून दाखवायचा. मनातला पत्ता ओळखणे, बघता बघता हातातील राजाच्या पत्त्याचे रूपांतर राणीच्या पत्त्यात करून दाखवणे अशा अनेक जादू तो करून दाखवायचा. सर्वात गंमत म्हणजे चार ओळीत पत्ते मांडून तो त्यात नंतर टाकलेले 7-8 पत्ते गायब करून दाखवायचा. त्याच्या जादू पाहून कॉलनीतील मुले चकित होऊन जायची.नंतर दोरी कापून ती पुन्हा जोडण्याची जादू तो करून दाखवयचा. त्यात तर त्याचा हातखंडा होता. तेव्हा तो जत्रेत आलेल्या एका जादूगाराकडून 50 रुपयांना एक अशा दराने तो सहा सात जादू शिकून आला होता. आणि कधीही जादू करून दाखवायला तो तयार असायचा. त्याच्या जादूच्या प्रयोगांनी शाळेत, नातेवाईकमंडळीत त्याचा भाव बराच वाढला होता. पुढे त्याने एकदा खुशीत असताना त्या सगळ्या जादूंचे रहस्य मला समजावून सांगितले. मला त्या करायला शिकवल्याही. पण त्याने शिकवूनही मला जादू करून दाखवणे कधीच जमले नाही. जादू करून दाखवायची म्हटले तरी मला भीती वाटायची. मात्र एक झाले. एकदा त्या जादूंमधील रहस्य समजल्यावर त्यातली गंमत निघून गेली.
आता मागे वळून पाहताना जाणवते, की आयुष्यात बऱ्याच गोष्टींचे असेच असते. त्यांच्याबद्दल मनात मोठे आकर्षण असते. त्यातील गूढ माहीत नसते, तोपर्यंत त्यांचे आकर्षण वाढत राहते.पण एकदा रहस्य समजल्यावत मात्र ते आकर्षण ओसरून जाते.
अशाच प्रकारची माझी आणखी एक आठवण आहे. माझ्या डोक्‍यावर खिचडी शिजवली होती, त्याची. मी पाचवीत असताना आमच्या शाळेत एकदा एक जादूगार आला होता. फार प्रसिद्ध जादूगार होता आणि व्याख्यानही छान देत असे. आमच्या शाळेत त्यांनी सकाळी भाषण केले होते. सर्वांना आवडले ते. भाषण संपल्यानंतर त्यांनी मुलांना काही शंका असल्या तर विचारायला सांगितले. अनेक मुलांनी वेगवेगळे प्रश्‍न विचारले. त्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी अगदी हसतखेळत दिली. त्यांच्या उत्तरांनी मुलांना आणखी आणखी प्रश्‍न विचारायला धीर आला. मधेच एका मुलाने उठून त्यांना विचारले, की परीक्षेत पहिला नंबर येण्याची काही जादू आहे का? जादूगार म्हणाले, बाळा, तशी काही जादू नसते. परीक्षेत पहिला नंबर येण्यासाठी भरपूर अभ्यास करणे, तो ही मनापासून एवढा एकच उपाय आहे. ते सांगणेही सर्वांना आवडले.
त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचे जादूचे प्रयोग होते. शाळेच्या मैदानावर. खूप वेगवेगळे प्रयोग त्यांनी करून दाखवले. अगोदर रुमालातून कबुतर काढून दाखवले. एका मुलाला बोलावून त्याला विचारले तुझ्या डोक्‍यात काय भरले आहे. त्याने काही उत्तर दिले नाही, तेव्हा त्यांनी त्याच्या कानातून भराभर भराभर लांबच लांब रिबन काढून दाखवली. ते पाहून सारी मुले खूप हसली. आपल्या डोक्‍यात रिबन भरलेली होती हे पाहून तो मुलगा मात्र खूपच लाजला आणि स्टेजवरून उतरून पळत पळत आपल्या जागेवर जाऊन बसला.
नंतर त्यांनी समोरच बसलेल्या मला स्टेजवर बोलावले. नाव वगैरे विचारले. तू भित्री आहेस की धीट आहेस असे विचारले. मी धीट आहे असे सांगताच ते म्हणाले. मी आता तुझ्या डोक्‍यावर खिचडी शिजवणार आहे. घाबरणार तर नाहीस ना? मनातून थोडीशी घाबरले होते. पण कबूल कसे करणार? नाही घाबरणार म्हणून दिले उत्तर. त्यांनी सर्व मुलांना सांगितले, मी आता या अश्‍विनीच्या डोक्‍यावर भात शिजवणार आहे. तिला चटके बसले तरी घाबरणार नाही म्हणून तिने सांगितले आहे. आता पाहू, ती काय करते.
त्यांनी मला खुर्चीत बसवले. डोक्‍यावर एक टोपी ठेवली डोळे बंद करायला सांगितले. मी केले. मग त्यांनी माझ्या डोक्‍यावर काहीतरी ठेवले आणि काही मंत्र म्हणू लागले. म्हणता म्हणता मला हळूच म्हणाले, डावा हात हालव. मी हात हलवू लागले. ते मुलांना म्हणाले, पाहा हिला गरम खिचडीचे चटके बसतात म्हणून ती एक हात हलवते, जास्त चटके बसले की दुसरा हात हलवील आणि खूपच चटके बसले तर दोन्ही पाय हलवेल.मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या. नंतर त्यांनी हळूच मला दुसरा हात, मग एक पाय आणि मग दुसरा पाय हलवायला सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले. मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मग त्यांनी माझ्या डोक्‍यावरचे भांडे काढून त्यातील गरमगरम खिचडी सर्वांना दाखवली. विचारले, कोणला खायची आहे का? काही मुले आली. मग त्यांनी मलाही च्मचाभर खिचडी दिली. ती मी खाल्ली, पण जादू खोटी होती, खिचडी शिजवताना मला अजिबात चटका बसला नाही हे मी कोणालाही सांगितले नाही. आतापर्यंत. आज मात्र सांगून टाकली आहे. खिचडीची गोष्ट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)