गोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

पणजी –  गोवा राज्याचा 2018-19 साठीचा एकूण 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाची तरतुद असलेला अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यानंतर लगेच पाच महिन्यांसाठी एकूण 7 हजार 134 कोटींचे लेखानुदान मांडून मंजूर  करण्यात आले. अर्थसंकल्पात कोणतेही नवे कर प्रस्ताव किंवा योजना नाहीत, पण हा रोजगाराभिमूख अर्थसंकल्प असून त्यातून मजूर, रोजगार निर्मिर्ती व शिक्षण या क्षेत्रांवर जास्त भर दिला गेला आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फक्त सहा मिनिटांचे अर्थसंकल्पीय भाषण केले. हे वर्ष रोजगार निर्मितीचे वर्ष असेल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. प्रत्येक खात्यासाठी व क्षेत्रसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात आली आहे. 2018-19 या वर्षासाठी एकूण 144.65 कोटींची महसुली वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर रोजगार संधी वाढविण्यावर सरकारने भर दिला आहे व त्यासाठी उद्योग, मजूर आणि रोजगार व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रंसाठी 548.89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणासह एकूण शिक्षण क्षेत्रसाठी 2 हजार 445 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे पर्रीकर यांनी नमूद केले.

-Ads-

गेल्यावर्षी अर्थसंकल्पाचा आकार एकूण 16 हजार 027.01 कोटी रुपये होता. यंदा हे प्रमाण 6.84 टक्क्यांनी वाढले व अर्थसंकल्प 17 हजार 123 कोटी रुपये खर्चाचा झाला. राज्याचा स्वत:चा कर महसुल हा 8 हजार 257 कोटी रुपयांचा आहे. यात केंद्रीय करातील गोव्याच्या वाटय़ाचाही समावेश आहे. 2019-19 साली वीज विक्रीसह अन्य स्रोतांद्वारे 13 हजार 664.95 कोटी रुपयांची प्राप्ती होईल, असे सरकारने अपेक्षित धरले आहे. 2017-18 साली हे प्रमाण 12 हजार 576.88 कोटी रुपये एवढे होते. यावेळी 8.65 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2018-19 साली केंद्रीय करांमध्ये गोव्याचा वाटा 2 हजार 979 कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 2 हजार 544 कोटी रुपये होते. एकूण 17 टक्के वाढ झाली आहे. करविरहित महसुलाचे प्रमाण 2 हजार 869.33 कोटींनी वाढणार आहे.

मुख्यमंत्री लीलावती इस्पितळातून दुपारी गोव्यात दाखल झाले. आपण ठीक असून आता गोव्यातच असेन व पुढील आठवडय़ात पुन्हा मंत्रिमंडळ बैठक घेईन, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)