गोविंदाच्या दिमतीला 4 हजार पोलीस तैनात

पुणे – दहीहंडीनिमित्त आज (सोमवारी) सायंकाळनंतर मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्याने जाणाऱ्या पीएमपी बस तसेच अन्य वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यानंतर शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, दहीहंडी उत्सवानिमित्त शहराच्या मध्यभागात चार हजार पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहेत.
शहरातील मध्यभागात विविध सार्वजनिक मंडळांतर्फे दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शिवाजी रस्त्याने स्वारगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक शिवाजीनगर येथील स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्त्याने वळविण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्याने टिळक चौकाच्या (अलका चित्रपटगृह) दिशेने जाणारी वाहतूक सोन्या मारूती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक, बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, केळकर रस्त्याने वळविण्यात येणार आहे.
मध्यभागात गर्दी वाढल्यानंतर परिस्थितीनुसार वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. शहरातील मध्यभाग तसेच उपनगरात 1100 मंडळांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. मध्यभागात बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, गुन्हे शाखेची पथके, साध्या वेशातील पोलीस तसेच वाहतूक पोलीस, असा चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मध्यभागातील दहीहंडी सोहळ्यावर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. संशयास्पद वस्तू तसेच व्यक्‍ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट-
पोलिसांची करडी नजर
मंडळांनी ध्वनीवर्धकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. दहिहंडी फोडणाऱ्या पथकांमध्ये अठरा वर्षांखालील मुलांचा समावेश करू नये. ध्वनीवर्धकांना रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मंडळांनी रूग्णवाहिका, पिण्याचे पाणी अशी सुविधा ठेवावी. ध्वनीवर्धकासंदर्भात दिलेल्या निकषांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)