गोवर-रूबेला मोहीमेत आरोग्य विभाग आघाडीवर

लसीकरणाची मोहीम 93 टक्‍के पूर्ण करण्यात यश

पुणे – केंद्र व राज्य शासनाकडून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पहिल्या दिवसांपासून आघाडी घेत, तब्बल 9 लाख, 67 हजार 945 बालकांना लस देऊन 93 टक्‍के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरणासह रुग्णसेवेला दिलेल्या गतीमुळे जिल्हा आरोग्य विभाग अव्वल स्थानी असून, लवकरच 10 लाख, 40 हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दि. 27 नोव्हेंबर 2018 पासून राज्यासह देशात ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. गोवर-रूबेला लस ही बालकांसाठी आवश्‍यक असून, न्यूमोनिया, अतिसार, मेंदू संसर्ग यासारख्या प्राणघातक आजारापासून संरक्षण मिळते. त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला ही लस दिली जात आहे. शहरात एका ठिकाणी मुलांना लसीकरणानंतर उलट्या, चक्‍कर येण्याचे प्रकार घडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचा परिणाम जिल्ह्यात होऊ नये यासाठी डॉक्‍टर, परिचारिका आणि नागरिकांनी पालकांमध्ये जनजागृती केली. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीमेचे योग्य नियोजन करून, पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमध्ये मुलांना लस देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल 60 हजार बालकांना लस देण्यात आली. त्यासाठी डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्यात लसीकरणाची गती अधिक असून, डिसेंबर 2018 अखेर मोहीम अंतीम टप्प्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर जे बालक लसीकरणातून सुटलेले आहेत, त्यांचा सर्व्हे करून त्या बालकांना लस देण्यात येणार असल्याचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

जिल्ह्यातील बालकांना गोवर-रूबेला लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. त्यांच्या या कामांमुळेच राज्यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा पहिल्या स्थानावर आला आहे. त्याप्रमाणे गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेतही आरोग्य विभागाने चांगले काम केले असून, लवकरच शंभर टक्‍के उद्दिष्ट पूर्ण होईल.
– प्रवीण माने, आरोग्य व बांधकाम सभापती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)