गोवर, रुबेला लसीकरण मोहीम शाळांना बंधनकारक

प्रातिनिधीक छायाचित्र

महापालिकेतर्फे सुरू करण्यात येणार


नाकारल्यास कारवाई करणार


27 नोव्हेंबरपासून मिळणार लस

पुणे – महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून शहरात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून ती सर्व शाळांना बंधनकारक आहे. ते नाकारल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी गुरूवारी सांगितले. या मोहिमेदरम्यान 9 महिने ते 15 वर्षे वयाच्या सुमारे 9 लाख 65 हजार 967 बालकांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

यावेळी महापालिकेतील आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते. ही लस अत्यंत सुरक्षित असून राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत ती सर्व बालकांना देणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या लसीकरण मोहिमेसाठी स्थापन केलेल्या सिटी टास्क फोर्स समितीची दुसरी बैठक गुरुवारी महापालिकेत झाली. तत्पूर्वी, आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. हंकारे यांनी या मोहिमेची माहिती दिली.

-Ads-

ही लस शाळा, अंगणवाडी, आरोग्यकेंद्रे आणि घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत 27 नोव्हेंबरपासून शहरातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून, स्थापन केलेल्या पथकांमध्ये प्रत्येक पथकामार्फत रोज दोनशे बालकांना ही लस दिली जाणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. देशभरात साडेनऊ कोटी बालकांना ही लस देण्यात आली आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून, ती मान्यताप्राप्त औषध कंपनीकडून पुरवली जाणार आहे. तसेच ती “ऑटोमॅटिक डिस्पोजल सिरिंज’द्वारे दिली जाणार आहे. या सिरींजची विल्हेवाट लावण्यासाठीच्या दोनशे “हब कटर’ मशिन्सही महापालिकेने विकत घेतल्या आहेत.

या मोहिमेसंदर्भात पोस्टर, बॅनर, समाजमाध्यमांमध्ये जागृती करण्यात आली आहेच, याशिवाय शाळांमध्येही मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांना या संबंधी माहिती देण्यात आली आहे. काही शाळांनी याला विरोध दर्शवला आहे. मात्र ही राष्ट्रीय मोहीम असून, ती बंधनकारक आहे. त्यामुळे त्याला विरोध करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासंबंधीचे पत्र सर्व शाळांना पाठवल्याचे उगले यांनी सांगितले.

तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक
गोवर, रुबेला लस मोफत असून, या संदर्भात एखाद्या शाळेने जर विद्यार्थ्यांकडून पैसे मागितले तर त्यासंबंधीच्या तक्रारींसाठी महापालिकेच्या आरोग्यविभागाने हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. 020-2448-7700 हा हेल्पलाइन नंबर असून, अडचण आल्यास यावर संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्यविभागाने केले आहे.

बालरोगतज्ज्ञांनाही सूचना
“खासगी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन लसीबाबत आम्ही सांगतो,’ अशी भूमिका अनेक पालकांनी घेतली आहे. तसेच शाळांमध्येही तसे सांगितले आहे. मात्र, खासगी बालरोगतज्ज्ञांनाही यासंदर्भात सूचना करण्यात आल्या असून, त्यांनीही यासंदर्भात जागृती करण्याचे आश्‍वासन दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)