गोवर-रुबेला लसिकरणानंतर मुलीला अर्धांगवायू?

प्रातिनिधीक छायाचित्र

लसिकरणाचा संबंध नाही : प्राथमिक तपासणीनंतर दावा


आठ दिवसांत अहवाल येणार : ससून रुग्णालय

पुणे/ हडपसर – गोवर-रुबेला लसिकरणानंतर ताप आल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या आठ वर्षीय मुलीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच बुधवारी खळबळ उडाली. परंतु, मुलीला झालेला त्रास आणि लसिकरणाचा संबंध नसल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आल्याचे सांगण्यात आले. “या निदानासाठी मुलीच्या मणक्‍यातून पाणी (सीएसएफ) काढले असून आठ दिवसांत त्याचा अहवाल येईल,’ असे ससून रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

श्‍वेता संतोष कांबळे असे संबंधित मुलीचे नाव आहे. तिच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लस दिल्यानंतर श्‍वेताच्या हाता-पायातील ताकद कमी झाल्याने पालकांनी तिला ससूनमध्ये दाखल केले. बालरोगतज्ज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत तिच्यामध्ये “गुलियन बारी सिंड्रोम’ विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीअंती समोर आले आहे. हा सिंड्रोम रुग्णाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करत असून त्यामुळे अशक्‍तपणा येतो. हा अर्धांगवायू नसला, तरी भविष्यात तसा त्रास होऊ शकतो. आजाराचे निदान करण्यासाठी “सीएसएफ’ लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत त्याचा अहवाल येईल.’

शहरात आतापर्यंत 9 लाख 66 हजार, राज्यात 80 लाख तर 28 राज्यांत मिळून 14 कोटी बालकांना गोवर-रुबेला लस देण्यात आली आहे. त्यामध्ये अशी लक्षणे आढळली नाहीत. दरम्यान, पालकांनी मुलांना उपाशीपोटी लस देऊ नये. लस दिल्यानंतर मुलाला ताप किंवा कोणत्याही प्रकारची “रिअॅक्‍शन’ आली, तर डॉक्‍टरांचा तत्काळ सल्ला घ्यावा.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय.

मुलीचे वडील म्हणतात…
“श्‍वेता महापालिकेच्या शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असून, लस देण्यापूर्वी तिला कोणताही त्रास नव्हता. शनिवारी (दि.1) लस देण्यात आली. त्यानंतर रात्री ताप आला. परंतू, लस घेतल्यानंतर ताप येऊ शकतो, त्यामुळे पालकांनी घाबरू नये असे पालकसभेत सांगितल्याने आम्ही जास्त विचार केला नाही. मात्र, तिला उठता-बसता येत नसल्याने मंगळवारी माळवाडी येथील सानेगुरूजी रुग्णालयात नेले. तेथे उपचारास नकार देत, ससूनमध्ये उपचाराचा सल्ला देण्यात आला. ससूनमधील डॉक्‍टरांनी साडेसहा हजारांचे एक इंजेक्‍शन सांगितले. यानंतर डॉक्‍टरांना विचारले असता, मुलीला अर्धांगवायू झाल्याचे सांगताच आमच्या पायाखालची जमीन सरकली. लस देण्यापूर्वी माझी मुलगी ठणठणीत होती. त्यामुळे महापालिकेने माझ्या मुलीच्या उपचाराचा खर्च उचलावा,’ असे संतोष कांबळे यांनी सांगितले. दरम्यान, संतोष कांबळे हे पूर्वी पेंटिंग व्यवसाय करत. मात्र, अपघातात त्यांचा पाय निकामी झाला. तर, मुलीची आई धुणी-भांडी करते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)