गोवर, रुबेला निर्मूलनाचे प्रयत्न!

पिंपरी – काही दिवसांपासून शहरातील शाळांमध्ये गोवर व रुबेला निर्मूलनासाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 15 जानेवारीपर्यंत ही मोहीम सामुदायिक सत्र, शाळा, अंगणवाडी केंद्र आणि सरकारी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी राबविण्यात येत असून बालकांना लसीकरण करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना तालेरा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वीणादेवी गंभीर म्हणाल्या की, गोवर हा संक्रमक व घातक आजार तर रूबेला सौम्य संक्रमक आजार असल्याने तो मुलांना व प्रौढांना होण्याची शक्‍यता असते. तसेच, गर्भवती स्त्रियांना हा आजार झाल्यास अचानक गर्भपात अथवा बाळांना जन्मजात शारीरिक दोष निर्माण होवू शकतो. त्यामुळे भारत सरकारने गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला नियंत्रणाचे उद्दीष्ट ठेवले आहे. याचबरोबर, गोवरने देशभरात दोन वर्षात सोळा हजार मुलांचा मृत्यू झाला.

गोवर हा जीवघेणा आजार असून ज्याचा प्रसार विषाणूद्वारे होतो. गोवरमुळे विविध प्रकारची गुंतागूंत होऊन बालकांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. लहान मुलांचा मृत्यू टाळण्यासाठी ही लसीकरण मोहीम राज्यभर राबवली जात आहे. तर रुबेला हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रसार विषाणूमुळे होतो. त्याची लक्षणे गोवरसारखीच असतात. गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रूबेलाचा संसर्ग झाल्यास त्याचा परिणाम जन्मजात रुबेला सिंड्रोम होऊ शकतो. ज्याचा परिणाम गर्भासाठी आणि नवजात शिशुसाठी घातक ठरु शकतो. या घातक आजारापासून वाचण्यासाठी लसीकरण मोहिमेचा लाभ घेणे आवश्‍यक आहे, असे डॉ. गंभीर यांनी सांगितले.

एक लाख बालकांना लस
महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 3 डिसेंबर 2018 अखेर 304 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत शहरातील 1 लाख 3 हजार 919 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहिमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खासगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)