गोळीबारानंतर गुणवरे गावात तणाव

हल्लेखोर अद्याप पसार : वर्चस्ववादातून हल्ला झाल्याची शक्‍यता

फलटण – बरड, ता. फलटण येथे गोट्या उर्फ गुलाब भंडलकर रा. गुणवरे ता. फलटण या युवकावर शुक्रवारी गोळीबार झाल्यानंतर शनिवारी दिवसभर गुणवरे गावात तणावाचे वातावरण होते. गावात बंद पाळल्यामुळे शुकशुकाट होता. दरम्यान, पसार झालेल्या हल्लेखोरांचा अद्याप शोध लागला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोट्या उर्फ गुलाब भंडलकर वय 35 यांच्यावर काल सायंकाळच्या सुमारास बरड-गुणवरे मार्गावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. यामध्ये भंडलकर गंभीर जखमी झाले. त्याला फलटण येथील एका खासगी रूग्णालयात तत्काळ हलवण्यात आले होते. खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले होते. त्यांच्यावर झाडण्यात आलेली गोळी पाठीमागे कमरेतून घुसून पोटातून बाहेर पडली. गोळी लागल्यावरही ते घटनास्थळावरुन जखमी अवस्थेत बरड पोलीस ठाण्यापर्यंत आल्याची चर्चा आहे.

गोळीबार नक्की कोणत्या कारणासाठी व कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा हल्ला गुणवरे गावातील वर्चस्ववादातून झाल्याचे समजत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली. घटनास्थळावरुन पोलिसांनी पुंगळी जप्त केली असून ती तपासणीसाठी पुण्यातील फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. या अहवालानंतर हल्लेखोरांनी नेमके कोणत्या प्रकारचे पिस्तुल वापरले हे समोर येणार आहे. गोळीबाराच्या निषेधार्थ आज गुणवरे गावात काही काळ बंदही पाळण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)