गोळीबारप्रकरणातील आरोपींना जेरबंद करा

उरूळी कांचनमध्ये व्यापारी, नागरिकांची मागणी

उरुळी कांचन- उरुळी कांचन येथील महात्मा गांधी रस्त्यावरील कापड व्यापारी वापरीमाल सावलदास व नारायण मोबाईल दुकानावर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई करावी, आरोपींची गावातून मिरवणूक काढावी, या मागणीसाठी गावातील व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी गोळीबाराचा निषेध करण्यात आला.
दहशत निर्माण करण्यासाठी व्यापाऱ्याच्या दुकानावर गावठी कट्ट्यातून मंगळवारी (दि. 13) सायंकाळी 7 सुमारास खंडणी मागण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध कापड व्यापारी वापरीमाल सावलदास व नारायण मोबाईल दुकानावर गोळीबार केला होता. त्यानंतर दोन सराईत फरार झाले होते. या प्रकरणामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबार करणारे सराईत गुन्हेगार असून पोलीस प्रशासनाने सीसीटीव्हीच्या आधारे हे गोळीबार करणारे ऋषभ रमेश बडेकर व दीपक दत्तात्रय धनकुटे (रा उरुळी कांचन. तालुका हवेली) यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी व खंडणी आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, हे गुन्हेगार अद्याप फरारी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सराईत गुन्हेगारांना लवकर अटक करण्यात यावी, यासाठी उरुळी कांचन परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत कडकडीत बंद पाळला. या घटनेचा निषेध केला. उरुळी कांचन परिसरात सध्या गुन्हेगारी फोफावली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • गुन्हेगारांसाठी सोन्याची कोंबडी

पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसराचा विस्तार गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात झाला आहे. हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन ही मोठी बाजारपेठ आहे. भौगोलिक आणि वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने या परिसराचा विस्तार झाला आहे. येथील बाजारपेठेत कापड, सुवर्णपेढी, फर्निचरची दुकाने लक्षणीय आहेत. तीन तालुक्‍यांतील अर्थकारणाचा कणा असलेली ही बाजारपेठ गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहे. खंडणी, दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. टोळीराज निर्माण झाल्यामुळे दहशत निर्माण करून व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचा प्रकार घडत असल्यामुळे ही बाजारपेठ गुन्हेगारांसाठी सोन्याची कोंबडी देणारी अंडी आहे. यातून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. या टोळींचा बिमोड करण्यासाठी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)