गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेची कबुली

लंडन: इंग्लंडने भारताचा चौथ्या कसोटीत पराभव करताना पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली. भारतीय संघावर सर्व स्तरांमधून टीका होत असताना भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेनेही पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार धरले आहे.

भारतीय गोलंदाजांनी प्रत्येक सामन्यात सुरेख मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचे काम केले. मात्र तिसऱ्या कसोटीचा अपवाद वगळता एकाही सामन्यात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करू शकले नाहीत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचे यश फलंदाजांच्या अपयशामुळे झाकोळले गेले आहे. आता पाचवी कसोटी सुरू झाली असताना फलंदाजांवरच अधिक जबाबदारी आहे.

इंग्लंडमध्ये फलंदाजी करत असताना संयम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मग तुम्ही फलंदाजी करत असाल किंवा गोलंदाजी. विकेट मिळवण्यासाठी एका टप्प्यावर गोलंदाजी करत राहणे गरजेचे असते. तसेच फलंदाजांनाही चेंडू सोडून देण्याचे कसब आत्मसात करणे गरजेचे आहे, असे सांगून रहाणे म्हणाला की, गोलंदाजांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली, मात्र फलंदाजांनी त्यांना योग्य साथ दिली नाही. फलंदाज म्हणून आम्ही सर्वजण या मालिकेत अपयशी ठरलो आहोत, अशी कबुलीही अजिंक्‍य रहाणेने यावेळी दिली.

स्वतःच्या फलंदाजीबद्दल विचारले असता अजिंक्‍य म्हणाला की, या मालिकेत मी संघाला उपयोगी पडेल अशी फलंदाजी केली नाही. काही डावांमध्ये मी खेळपट्टीवर जम बसवल्यानंतर चांगले फटके खेळत होतो. मात्र संघाला विजय मिळवून देईपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणे, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे हे अपयश स्वीकारणे मला भागच आहे. अर्थात मालिका आम्ही गमावलेली असली, तरीही आम्ही शेवटच्या कसोटीत तितक्‍याच जोमाने विजयासाठी प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात बरेच विक्रम होणार आहेत. त्यापैकी एक विक्रम अजिंक्‍य रहाणे करणार असून हा त्याचा अर्धशतकी कसोटी सामना ठरू शकतो. पन्नासावा कसोटी सामना खेळणारा रहाणे हा 32वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. त्याचबरोबर ही कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील तो 280वा खेळाडू ठरेल.

आतापर्यंत भारताचे माजी खेळाडू इरापल्ली प्रसन्ना आणि किरण मोरे यांनी 49 कसोटी सामने खेळले होते, अजिंक्‍यला यावेळी त्यांना मागे टाकण्याची संधी आहे. अजिंक्‍यने आतापर्यंत 49 कसोटी सामन्यांमध्ये 41.50च्या सरासरीने 3113 धावा केल्या आहेत. यामध्ये नऊ शतकांसह 14 अर्धशतकांचा समावेश आहे. एक क्षेत्ररक्षक म्हणूनही अजिंक्‍यने आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत 49 सामन्यांमध्ये त्याने 63 झेल टिपले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)