गोरेंच्या रजाअर्जावर अद्याप नाही सही

दैनंदिन कामाचा खोळंबा

सातारा, दि. 3 (प्रतिनिधी)-सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्या रजा अर्जावर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी अद्याप सही केलेली नाही. तरीसुध्दा गोरे तीन दिवस पालिकेत न फिरकल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. गोरेंच्या या राजकीय आजारपणामुळे पालिकेचा कारभार शॅडो मुख्याधिकाऱ्यांना हाकण्याची वेळ आली आहे.
गोरें कुटुबियांच्या आजारपणाची पोलखोल नगरसेवकांनीच सर्वसाधारण सभेत केल्याने गोरेंच्या खऱ्या परिस्थितीचा साऱ्यांनाच उलगडा झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या अस्वास्थतेचा अंक बारामती ते पाडेगाव व्हाया सातारा असा सुरू होता. आणि ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. मात्र त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तब्बल पंधरा दिवसाचा रजा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देऊन गोरेंनी पालिकेतून काढता पाय घेतला तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र सर्व साधारण सभेत गोरेंची कोणकोणत्या प्रकरणात चौकशी लागली याचा खुलासा झाल्याने गोरेंच्या रजेचे कारण हे कौटुंबिक नसून राजकीय असल्याचे स्पष्ट झाले होते. जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार यांच्याकडून गोरे यांचा रजा अर्ज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या टेबलावर पोहचला आहे. मात्र त्यावर सही झालेली नाही. मात्र नियमाप्रमाणे रजा मंजूर झाल्याशिवाय कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला मुख्यालय सोडता येत नाही. तरी पण गोरेंनी रजा मंजूर झाल्याच्या अविर्भावात पालिकेकडे न फिरकण्यात धन्यता मानल्याने दैनंदिन कामाचा खोळंबा झाला आहे. सभासचिव राजेश काळे यांना शॅडो मुख्याधिकाऱ्याची भूमिका बजावण्याची वेळ आली आहे. गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरणाऱ्या लोकशाही दिनावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात वारंवार समज देऊनही गोरे यांच्या वागणुकीत काहीच फरक पडलेला नाही. त्यातच गोरे कोणालाच न सांगता पालिकेतून गायब झाले. त्यावर जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार हा खरा औत्सुक्‍याचा विषय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)