गोरेंच्या चौकशीचाच पाय खोलात

-आरोपांचा ससेमिरा
-कागदी फार्स नको
-कारवाई होणार का?

संदीप राक्षे
सातारा – सातारा विकास आघाडीच्या चिरेबंदी वाड्यात प्रांतांच्या चौकशीनं मोठ काहूर उठल आणि जो तो आता कारवाईच्या गळाला मासा लागला याची खसखसं सकाळच्या गारठलेल्या थंडीत पिकवू लागला तर इकडे पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे साताऱ्याच्या बाहेर जाणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसलेले. भयंकर स्थितप्रज्ञ माणूस, बुद्धाच्या हसण्यामध्ये आणि यांच्या हसण्यामध्ये विकारांचा काय तो फरक. बाकी कोणत्या आरोपांनी अथवा अंर्तगत कुरबुरींनी चित्त काय ढळेल या माणसाचे अगदी साशा कंपनीची शप्पथ. सध्या शंकरराव गोरेंच्या अडीच वर्षाच्या कारभाराची चौकशी सुरू झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा विकास आघाडीच्या गोटातही खळबळं आहे, मात्र चेहऱ्यावरची रेषा सुध्दा हलवायची नाही याचा पण साविआच्या सदस्यांनी केला आहे. सध्या तरी आम्ही गोरेंच्या गावचेच नाही असा विश्‍वामित्री पवित्रा सातारा विकास आघाडीने घेतल्याने शंकररावांना नावाप्रमाणेच विरक्ती आली आहे. साहेबांचा काळ्या कोटावर प्रचंड विश्‍वास मात्र कायद्याच बोलणारी माणसे पोवई नाक्‍यावरून अचानक सहलीला गेल्याने गोरेंना दोस्त दोस्त ना रहॉं असे म्हणत शॅडो मुख्याधिकाऱ्यांचा खांदा आसवे टिपायला मिळाला होता. मात्र शॅडो सुद्धा नगराध्यक्षांच्या कंपूत असल्याने आता नाथ कोण माझा? या नाट्यपदाची आठवण गोरेंना नक्कीच येत असणार. तरी पण पंढरपुरात जे कमावले ते साताऱ्यात गमवायचे नाही हाच इरादा साहेबांचा आहे. आधीच शनीची साडेसाती त्यात चौकशीचे शुकलकाष्ठ त्या भीतीपोटी साहेबांनी सरकारी निवासस्थानात कोंडून घेतले होते. साहेबांच्या सोयीस्कर कारभाराला राजाश्रय लाभला की नाही हे साताऱ्यातील राजभाटांना विचारावे लागेल.

राजभाटांनीच साथ सोडल्याने गोरेंनी जिल्हा प्रशासनाच्या दालनात विरक्तीची टीपे गाळली. ऐन लोकसभेच्या तोंडावर सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या काळात मुख्याधिकाऱ्यांची चौकशी लागावी हा नगरपालिकेच्या इतिहासातील काळा दिवस गणला जाईल मात्र मुख्याधिकाऱ्यांची चौकशी म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाची चौकशी होय. मात्र ती तितक्‍या पारदर्शक व निःपक्षपातीप्रमाणे होणार आहे का ? तर येथे संशयाला जागा आहे. जर सातारा पालिकेचे बजेट राजेशाही गुलदस्त्यात मंजूर होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 52 त्रुटींना कोपऱ्यात टाकले जाते यातच सातारकरांनी समजायचे आपल्या दुर्दैवाचे दशावतार अद्यापही सुरूच आहेत. राजेशाही हस्तक्षेपाला होयबा म्हणणारा जो सीओ हवा आहे त्यात शंकरराव गोरे हे त्या व्याख्येत तंतोतंत फिट बसतात.

सातारकरांच्या घामाच्या पैशाला तुघलकी पध्दतीने बुल्डोझर लावणाऱ्या चोरट्यांचे हे शासकीय साक्षीदार चौकशीचा ससेमिरा घेतील तर नाही तर काय प्रमोशन घेतील का ?. कदाचित या चौकशीत क्‍लीनचीट घेण्यात साहेब यशस्वीपण होतील साऱ्या शक्‍यता तशाच दिसत असल्याने हा काय ? चौकशीचा फार्स म्हणायचा का ? हा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे. नेहमी साताऱ्याच्या विकासासाठी गळे काढणारे टेंडरबाज नगरसेवक कसे गप्प आहेत ? अगदी नगराध्यक्षांशी संवाद न साधणारे सीओ कोणाच्या सांगण्यावरून ऑपरेट होतात याचे गेल्या अडीच वर्षात अनेक पुरावे आहेत. तरी पण कारवाई होईलच याचा नेम नाही.

सातारा पालिकेच्या 2/3 जागा गिळंकृत करणाऱ्या स्थावर जिंदगीच्या सूर्यकांत भोकरे या कर्मचाऱ्याला सफाईदारपणे वाचवण्यात आले. आता भोकरेंची पेन्शनसुद्धा सुरू झाली म्हणे. इथेही मोठा राजकीय हस्तक्षेप होताच तो कोण्या समर्थक नगरसेवकांचा असेल तर त्याचा थेट दोषारोप आघाडीच्या नेत्यांवर जाणार आहे. शेवटी साताऱ्याचे राजकारण कोठे येऊन थांबते तो परवलीचा शब्द समस्त सातारकरांना ठाऊक आहे. त्या परिघामध्ये सीओंची चौकशी कुठे बसते हे वेगळे सांगायला नको आणि त्यांना यथावकाश कलीनचिट मिळाली तर सातारकरांना आश्‍चर्य पण वाटायला नको. लक्ष्मी दर्शनात सगळा खेळं दडलाय हे सांगायला आमच्या बोगदा परिसरातील शेंबडं पोरग सुद्धा पुरेसं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)