गोरखपूरच्या प्रकरणी पंतप्रधानांनी मागवला अहवाल

7 तारखेपासून मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या 64 वर

“अक्षम्य दुर्लक्ष’ विरोधकांकडून टीकेची झोड

नवी दिल्ली- गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बालकांच्या मृत्यूची पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून पंतप्रधान या प्रकरणावर बारिक लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्याच्या आरोग्य मंत्रालयांशीही संपर्क “पीएमओ’कडून कायम संपर्क ठेवला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव हे या प्रकरणाचा आढावा घेत आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

गोरखपूरच्या बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये गेल्या 48 तासांमध्ये 30 बालकांचा ऑक्‍सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा दंडाधिकारी राजीव रौतेला यांनी सांगितले. तर 7 डिसेंबरपासून वेगवेगळ्या कारणांमुळे बालकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या 64 झाली असल्याचे उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले. गोरखपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी बालकांच्या मृत्यूचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र ऑक्‍सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे 21 बालकांचा मृत्यू झाला, असे जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

दरम्यान बाबा राघवदास मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. राजीव मिश्र यांना तातडीने निलंबित करण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. त्यांच्या सूचनेनुसार आरोग्य राज्यमंत्री आणि केंद्रीय सचिव गोरखपूरचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावरून सपा, बसपा आदी विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील सत्तारुढ योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. बालकांचे हे मृत्यू केवळ अक्षम्य निष्काळजीपणामुळे झाले असल्याचा आरोप या पक्षांनी केला आहे. या दोन्ही पक्षांनी गोरखपूरमध्ये आपापल्या पक्षाचे पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

“मुख्यमंत्री स्वतः गोरखपूरच्या दौऱ्यवार असताना ही घटना घडली आहे. मात्र पूजा पाठ करण्यामधून त्यांना या समस्येकडे वेळ देता आलेला नाही. तिरंगा, वंदेमातरम, मदरसा, ऍन्टी रोमिओ पथक यासारख्या मुद्दयामुळे समाजाच्या खऱ्या समस्यांकडे डोळेझाक केली जात आहे.’ अशी टीकाही मायावती यांनी केली.

ऑक्‍सिजन सिलेंडरचे देणे थकले
ऑक्‍सिजन सिलेंडरच्या अभावामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे ऑक्‍सिजन सिलेंडर पुरवणाऱ्या कंपनीने थकित देणे वसूल होईपर्यंत पुरवठा थांबवत असल्याचे हॉस्पिटलला कळवले होते. याचा अर्थ आरोग्य प्रशासनाला याची जाणीव असूनही ऑक्‍सिजन सिलेंडरची थकित देणी दिली गेली नव्हती. हा अक्षम्य निष्काळजीपणा आहे, अशी टीका सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. या प्रकरणी पीडीत कुटुंबांना योग्य ती मदत दिली जायला हवी आणि या प्रकरणाची उच्च स्तरिय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी बसपा प्रमुख मायावती यांनीही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)