गोयंका इंटरनॅशनल स्कुलच्या विश्‍वस्तांसह नऊ जणांचा अटकपूर्व फेटाळला

सत्र न्यायाधीश व्ही.के.कदम यांचा आदेश


 

विशेष मुलाचा छळ केलेले प्रकरण

पुणे- नगर रस्त्यावरील सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विशेष मुलाला लागणाऱ्या विशेष सुविधा, शिक्षक न पुरवता त्याचा मानसिक, भावनात्मक छळ केल्याप्रकरणी शाळेच्या विश्‍वस्तांसह नऊ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला आहे.
शाळेचे विश्‍वस्त संदीप चंद्रप्रकाश गोयंका (वय 50, मुंबई), अर्चना संदीप गोयंका (वय 47), शिक्षक मेघा अविनाश दोडेजा (वय 43), माजी मुख्याध्यापिका शेफाली तिवारी (वय 44, विमाननगर), रिमा संजय खुराणा (वय 46, रा. शंकरशेठ रोड), निशा निरंजनकुमार शहा (वय 32, भवानी पेठ), पूजा भल्ला (वय 40, कोंढवा), सचिन महादेव चव्हाण (वय 29, घाटेवाडी) आणि लिनाझ सरोश सोनावाला (रा. कॅशीया बिल्डींग, झिरकॉन को. ऑप हाऊसिंग सोसायटी विमाननगर) अशा 9 जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी मुलाच्या 37 वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 11 एप्रिल ते 27 सप्टेंबर 2017 दरम्यान हा सर्व प्रकार घडला. फिर्यादी यांचा 7 वर्षांचा मुलगा विशेष आहे. त्यांनी प्रवेश घेतेवेळी मुलाबाबत माहिती दिली होती. त्यावेळी शाळेने त्याच्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यासोबतच वेगळे शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञाचीही मदत घेतली जाते, असे सांगितले. त्यामुळे शाळेत 1 लाख 18 हजार रुपये फी भरून प्रवेश घेतला. मात्र, मुलाला विशेष सुविधा न देता त्याचा मानसिक, भावनात्मक छळ केला. एक व्यक्ती म्हणून जीवन जगण्याच्या मानमर्यादेच्या अधिकारापासून वंचित केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षण हक्क कायद्यांसह इतर कलमान्वये देखील गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा कट रचून करण्यात आला आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून गुन्ह्याचा तपास होण्याची आवश्‍यकता असल्याचा युक्तीवाद करत अतिरिक्त सरकारी वकील एस. एम. जगताप यांनी नऊ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली.त्यानुसार न्यायालयाने नऊ जणांचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)