गोमॅकोच्या शवागरातून मृतदेह गायब 

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मागीतली माफी 
पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरातून एका युवकाचा मृतदेह गायब झाल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधिताच्या कुटुंबियांनी चौकशी केली असता अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावत असताना या युवकाच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी संबंधिताच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे.
या प्रकरणी संबंधित युवकाच्या कुटुंबाने पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा डॉक्‍टरांविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणाची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गंभीर दखल घेत डॉ. एडमंड, डॉ. मच्छिंद्र जल्मी व प्रकाश नार्वेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
हळदोणा येथील जानुझ गोन्साल्वीस या 24 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची शवचिकित्सा 24 सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर शवागरात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला. आज त्याच्या कुटंबाने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली तेव्हा शवागरात मृतदेहच नसल्याचे आढळून आले. काल संध्याकाळी शवागरातील सुमारे दहा अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यात जानुझच्या मतृदेहाचाही समावेश करण्यात आला, अशी माहिती शवागराच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
दरम्यान, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत दोषी आढळणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. विभागाचे प्रमुख डॉ. एडमंड रॉड्रीगीश यांना हल्लीच सरकारने निवृत्तीनंतर सेवावाढ दिली होती. सेवावाढीच्या काळात त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)