गोदावरी दूध संघाचे सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान

दूधउत्पादकांचे नेते नामदेवराव परजणे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 45 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूधउत्पादक संघाने आधुनिकतेचा स्वीकार करून प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवनवीन प्रकल्प कार्यरत केलेले आहेत. गोदावरी दूध आणि ग्राहक यांच्यातील विश्‍वासाचे एक अतूट नाते निर्माण झाल्याने संघाने महाराष्ट्रात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सहकार क्षेत्रात संघाचे योगदान निश्‍चितच मोठे आहे.

महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्त्वावर आज जे जे दूध संघ कार्यरत आहेत त्यात कोपरगाव तालुक्‍यातील गोदावरी खोरे दूधउत्पादक संघाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. सहकारातील अनेकविध घडामोडी आणि खासगीकरणाबरोबरच नैसर्गिक आव्हानांना तोंड देत संघाची गेल्या चार दशकाहून अधिक काळापासूनची वाटचाल सुरू आहे. गोदावरीमुळे कोपरगाव, राहाता व आसपासच्या तालुक्‍यातील आर्थिक विकासाला मजबूत चालना मिळालेली आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायामुळे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, मजूर, महिला यांना शाश्‍वत रोजगार उपलब्ध झालेला आहे.
सन 1972 साली केवळ 80 लीटर संकलनाने संघाचे कामकाज सुरू झाले. ते बघता बघता 2 लाख लीटरपर्यंत गेले. कोपरगावसह आसपासच्या तालुक्‍यातील सुमारे 40 ते 45 हजार कुटुंबांना संघामुळे आधार मिळाला. संघाने कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर दूध संकलन करणाऱ्या संस्था स्थापन करून त्यांच्यामार्फत संकलित केलेले दूध संघ साइटवर आणण्यासाठी स्वत:ची सक्षम वाहन यंत्रणा उभी केली. गोदावरी दुधाला शाश्‍वत बाजारपेठ निर्माण झाली. प्रसंगी शासनाच्या दरापेक्षा जादा दर देऊन उत्पादकांचे हीत संघाने जोपासले. कार्यक्षेत्रात दूधउत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने स्व. मनीभाई देसाई यांच्या उरळीकांचन येथील कृषी उद्योग प्रतिष्ठानतर्फे कृत्रिम गो-पैदास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संघाने राबविला. कोपरगाव व राहाता तालुक्‍यातील सुमारे सव्वाशे ते दीडशे गावांसाठी 20 ते 22 केंद्रांमार्फत कृत्रिम रेतन गर्भधारणा कार्यक्रम राबवून जातीवंत कालवडींची पैदास केली. हा कार्यक्रम राबविताना संघ स्वत: झळ सोसून शेतकऱ्यांकडून नाममात्र शुल्क आकारते. याशिवाय भारतीय अनुसंधान परिषदेमार्फत सिध्द वळूची योजनाही राबविली जात आहे. नव्वद टक्‍के कालवडीचे प्रमाण असणाऱ्या अमेरिकेतून आयात केलेल्या सॉर्टेड सीमेनचा (सुधारीत वीर्य) वापर करण्याचा मान भारतात सर्वप्रथम गोदावरी दूध संघास मिळाला आहे. “बायफ’ विकास संशोधन प्रतिष्ठान आणि गोदावरी दूध संघ यांच्या संयुक्‍त विद्यमाने हे सुधारीत वीर्य दूधउत्पादकांना अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे गेल्या एक ते दीड वर्षात या वीर्यापासून कार्यक्षेत्रात कालवडींच्या जन्माचे प्रमाण सुमारे 90 टक्‍के वाढले आहे.

नामदेवराव परजणे

संघाने गोदावरी दुधाबरोबरच श्री साईप्रसाद पेढा, तूप, लस्सी, दही, पनीर, श्रीखंड, आम्रखंड, सुगंधी दूध, मसाला ताक अशा उत्पादनांची निर्मिती करून ते ग्राहकांना विनाविलंब मिळण्यासाठी बाजारपेठ निर्माण केलेली आहे. उत्तम दर्जा, योग्य किंमत आणि दीर्घ काळ टिकण्याची क्षमता असलेल्या या उत्पादनांना बाजारपेठेत सर्वत्र चांगली मागणी आहे. संघाने दूधउत्पादकांसाठी विविध योजना राबविलेल्या आहेत. दुभत्या जनावरांसाठी चारा, पशुखाद्य, सरकी पेंड, गवत, मिनरल मिक्‍श्चर गोचीड निर्मूलन औषधी, चॉपकटर, पाण्याच्या टाक्‍या, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजन काटे, संगणकीय दूध तपासणी यंत्रणा, मिनी कॉम्प्युटर सिस्टीम अशा विविध योजनांचा लाभ दूधउत्पादकांना मिळवून दिलेला आहे.

दूधउत्पादकांचे दूध संघाने साइटवर येईपर्यंत ते नाश होऊ नये यासाठी कार्यक्षेत्रात बहुतांशी सेंटरवर बल्क कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवरा सहकारी बॅंक, स्टेट बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेकडून गायी खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. केवळ पारंपरिक कार्यप्रणालीवर विसंबून न राहता संघाने संघ कार्यस्थळावर नवीन यंत्रसामुग्री बसवून कार्यक्षमता व कामाची गती वाढविली आहे. अत्याधुनिक रेफ्रिजरेशन यंत्रणा, पाश्‍चुरायझर, होमोजिनायझर, सीआयपी युनिट, पाच टनी कन्डेन्स मिल्क प्लॅन्ट, बॉयलर, क्रेट वॉशर, क्रीम सेपरेटर, अमोनिया कॉम्प्रेसर, कोल्ड रूम, हॉट वॉटर जनरेटर व इतर अत्याधुनिक यंत्रसामुग्री आज संघामध्ये कार्यरत आहे. यामुळे मनुष्य बळाचा वापरही कमी होत आहे. संघाच्या सोलर पॉवर प्लॅन्टचे काम हाती घेण्यात आलेले असून ते एक-दोन महिन्यांत पूर्ण होईल. भविष्यात दहा टनी पावडर प्रकल्प, तसेच आईस्क्रीम प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. जातीवंत कालवडी निर्माण करण्यासाठीची व जनावरांची आरोग्य तपासणी करण्यासाठीची अत्याधुनिक प्रयोगशाळाही उभारण्याचा संघाचा मानस आहे. प्राथमिक दूध संस्थांचे सचिव, तपासनीस, मदतनीस यांच्यासाठी दूधउत्पादन खर्च नियंत्रण, गुणप्रत तपासणी व इतर माहिती देण्यासाठी प्रशिक्षण संस्था कायमस्वरुपी कार्यरत केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे खासगी व्यावसायिक दुग्ध व्यवसायात उतरल्याने प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. अशा संकटांना तोंड देत गोदावरी दूध संघाची वाटचाल सुरू आहे. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाने दुग्ध व्यवसायात प्रचंड क्रांती केलेली आहे. नवनवीन प्रकल्प, नव्या संकल्पना, दूधउत्पादक व कर्मचारी यांच्यासाठी विविध योजना राबवून संघाची सहकार क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून ठेवली आहे. संघ व्यवस्थापनाच्या कामकाजातील सुसूत्रता व कर्मचारी यांच्यातील सुसंवाद यामुळेच संघ अनेक अडचणींवर मात करू शकला. निरंतर सुधारणा व गुणवत्ता धोरणाचा अवलंब केल्यामुळेच संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार लाभलेले आहेत.

सी. एस.गाढवे
कार्यकारी संचालक, गोदावरी दूध संघ

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)