गोंधळलेला ‘बबन’…

दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे यांनी ‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्या सिनेमातून आपली वेगळी छाप सोडत राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली होती. आता ‘बबन’ या सिनेमातून पुन्हा एकदा त्यांनी ग्रामीण भागातील कथा आपल्यासमोर आणली आहे. ‘ख्वाडा’ मध्ये बघायला मिळालेला त्यांचा रांगडेपणा यातही कायम आहे, मात्र तो अधिक भडक झाल्याने सेन्सॉर बोर्डाने ‘बबन’ला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे.

‘बबन’ ही ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन युवकांची कथा आहे, घराच्या  हालाखीच्या परिस्थितीत बबन (भाऊसाहेब शिंदे)ला आपले अस्तित्व निर्माण करायचे आहे, वडील बैजू (भाऊराव कऱ्हाडे) व्यसनी आहेत यामुळे त्याला कोणताही आधार नाही, आपण काही तरी करायला हवे याची जाणीव त्याला आहे, त्यामुळे तो महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानांच दुध संकलन करून एमआयडीसी मधील कंपन्यांना पुरवण्याचे काम करतो, मात्र या कामात त्याला गावातील लोकांकडून काही अडचणी येतात. दुसरीकडे वर्गातील कोमल (गायत्री जाधव)च्या तो प्रेमात आहे, त्याला इथेही संघर्ष करावा लागतोय. ‘बबन’ आपल्या स्वप्नांच्या मागे धावतोय… त्याला यश मिळते का? कोमल आणि बबन यांची प्रेमकथा फुलते का? या प्रश्नांच्या उत्त्तारासाठी ‘बबन’ बघायला हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून अतिशय संवेनाशील दिग्दर्शक अशी भाउराव कऱ्हाडे यांची ओळख निर्माण झालेली आहे, यामुळे त्यांच्या ‘बबन’ कडून मोठ्या अपेक्षा होत्या, या अपेक्षा पूर्ण करण्यात कऱ्हाडे कमी पडले आहेत. चित्रपटाची कथा – पटकथा यामध्ये काही गोंधळ झाला आहे. यामुळे तोच गोंधळ पडद्यावरही बघायाल मिळतो. नायकाची जगण्याची संघर्षगाथा मोठी करायची? प्रेमकथा फुलवायची? की गावातील बेरके राजकारण प्रेक्षकांना दाखवायचे? यावर दिग्दर्शकाच्या मनात संभ्रम असावा असे हा चित्रपट पाहिल्यावर जाणवते. तसेच काही प्रसंग ‘या कथेशी यांचा खरचं यांचा संबध आहे का?’ असा विचार करायला भाग पाडतात. तसेच बेसुमार शिव्यांचा वापर अनावश्यक वाटतो. अत्यंत साधी – सोपी भाषा ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. ग्रामीण भागातील व्यक्तीरेखा उत्तम हेरल्या आहेत यात शंका नाही.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर ‘बबन’ मध्ये अभिनयात पदार्पण करणारे दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे बैजुच्या भूमिकेत अगदी फीट बसले आहेत. भाऊसाहेब शिंदेने साकारलेला बबन मनाला भावतो. गायत्रीचा हा पहिलाच सिनेमा आहे, तिला अभिनयाची पार्श्वभुमी नाही हे सहज लक्षात येतं, व्हिलन साकारलेल्या देवेंद्र गायकवाड यांचा प्रयत्न चांगला आहे. इतर कलाकारांचा अभिनय ठीकठाक आहे. ‘बबन’चे शुटिंग रियल लोकेशन्सवर झालेले आहे, ड्रोनचा वापर चांगला केला आहे. चित्रपटात पाच गाणी आहेत. हर्षित अभिराज, ओमकरस्वरूप यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चांगली आहेत, परंतु ती कुठेही अचानक येतात यामुळे ती खटकतात. म्युझीकल फिल्म करण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला असता तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता असे म्हणण्यास मोठा वाव आहे.

दोन वर्षापूर्वी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने बॉक्स ऑफिसवर फुल टू कल्ला केल्याने अलीकडे अनेक दिग्दर्शक त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. भाउराव कऱ्हाडे यांनी ‘ख्वाडा’ मधून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र दुर्दैवाने ‘बबन’ ही ‘सैराट’च्या मार्गाने जाण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे असे नमूद करावे लागते.
एकंदरीत ‘बबन’ बद्दल सांगायचे तर संकल्पना चांगली असली तरी उपकथानकाच्या अनाकलनीय वापरामुळे ‘बबन’ काहीसा गोंधळला आहे.

चित्रपट – बबन
निर्मिती – चित्राक्ष प्रोडक्शन
दिग्दर्शक – भाउराव कऱ्हाडे
संगीत – हर्षित अभिराज, ओमकारस्वरूप
कलाकार – भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, भाउराव कऱ्हाडे, देवेंद्र गायकावाड, अभय चव्हाण, योगेश डिंबळे, सीमा समर्थ आदी.
रेटिंग – **
– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)