गोंदियात दोन ट्रकच्या अपघातात ड्रायव्हर जळून खाक

गोंदिया : देवरी तालुक्‍यातील मसूलकशा घाटाजवळ आज सकाळी दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की,यात एका ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या ट्रकमधील चालक आणि क्‍लीनरने अपघात होताच घटना स्थळावरून पोबारा केला आहे.
नागपूरहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची आणि रायपूरवरुन नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकची एकमेकांना समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की धडक होताच ट्रकला आग लागली. रायपूरच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकमध्ये विद्युत विभागाचे ट्रान्सफॉर्मर असल्याने ट्रकने अपघात होताच अचानक पेट घेतला. ट्रकचालक हा ट्रकमध्ये एकटाच असल्याने आणि त्याचा पाय स्टेरिंगमध्ये अडकल्याने ट्रकमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तो ट्रकमध्ये अडकला गेला आणि जिवंत जळला. तर आग लागण्याने राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहातूक दोन तास थांबली. दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.
घटनास्थळापासून देवरी तालुका हा 5 किलो मीटर अंतरावर आहे. देवरी नगर पंचायत राष्ट्रीय महामार्गावर असून नगर पंचायतीकडे अग्निशमन दलाची गाडी नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अशी घटना घडल्यास गोंदियावरुन 70 किलोमीटरचा अंतर ओलांडून अग्निशमन दलाचे बंब बोलावून आग विझवावी लागते. दरम्यान, ट्रक पूर्ण जळाल्याने ट्रकचालकाची ओळख पटू शकली नाही. उशिरा पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीने उर्वरित आग विझवली. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)