गोंदवलेल्या बहिण-भावांच्या कष्टाचे झालं चीज

गोंदवले खुर्द येतील रोहित व रक्षिता यांनी जलसंधारणच्या कामात खणलेल्या सीसीटीमध्ये पाणी साठा झाला आहे. (छाया : संदीप जठार)

श्रमदानातून बांधलेला नालाबांधात साठले पावसाचे पाणी

गोंदवले, दि. 29 (प्रतिनिधी) – दुष्काळाचे चटके सोसल्याने आपला गाव दुष्काळमुक्त करायचाच, असा निर्धार करत उन्हाळ्याच्या सुट्टीत श्रमदान करणाऱ्या भावा-बहिणींच्या कष्टाचे अखेर चीज झाले आहे. त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामात पावसाने जलधारा बरसून अभिषेक केल्याच्या भावना या दोघांनी व्यक्त केल्या.
दुष्काळ हद्दपार करायचाच म्हणून झपाटलेल्या गोंदवले खुर्द मधील सोळा वर्षीय रोहीत बनसोडे याने 13 वर्षीय बहिण रक्षिताच्या मदतीने उन्हाळ्याच्या सुट्टीत मौजमजा करण्यात वेळ न घालवता पाण्यासाठी श्रमदानाला सुरुवात केली होती. हे कामही कोणाच्याही व कसल्याही मदतीशिवाय सुरू केले होते. एक गुंठाही जमीन नसलेल्या रोहितने जलसंधारणाच्या ध्वनीचित्रफित पाहिल्यानंतर आपणही आपल्या गावासाठी अशी कामे करु शकतो, असे ठरविले. याच दरम्यान व्यायामासाठी जाताना त्याला जानाई तलावाचे उजाड माळरान जलसंधारणाच्या कामासाठी खुणावू लागले. उन्हाळ्याची सुट्टी सुरु होताच व्यायामासाठी येतानाच त्याने हातात फावडे व घरीच बनविलेली कुदळ घेतली व कामाला लागला. त्याच्या कुटुंबियांना याची पूर्वकल्पना होतीच. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. परंतु, आपला भाऊ भर उन्हात पाण्यासाठी एकटाच राबतोय हे पाहून रोहीतची धाकटी बहीण रक्षितादेखील प्रभावित होवून मदतीला धावली. दोघांनी दिवसभरात सुमारे पाच तास हे जलसंधारणाचे काम करुन महिनाभरात 52 हून अधिक समतल चरींचे खोदकाम व एक मोठा नालाबांधही घातला.
हे काम पूर्ण केले खरे, पण आता प्रतिक्षा होती ती पावसाची. गेल्या काही दिवसात ठिकठिकाणी मोठ्या पावसाने हजेरी लावली. परंतु, गोंदवल्याला मात्र, केवळ रिमझीम पावसावरच समाधान मानावे लागले. याच दरम्यान रोहीत व रक्षिताला प्रतिक्षा होती. ती मोठ्या पावसाची. अन्‌ काल दुपारी ही प्रतिक्षाही संपली. भर पावसातच दोघांनी जानाईचे माळरान गाठले. या पावसामुळे केलेल्या कामात मोठ्या प्रमाणात पाणीसाठी झाल्याचे पाहून दोघेही हरखून गेले. या कामामुळे आगामी काळातील पाणीटंचाईचा भार नक्कीच कमी होण्यास मदत होणार असल्याचे समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर तरळत होते. गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे केलेल्या कामात आज पाणीसाठा झाल्याचे पाहून उन्हाळी सुट्टी कारणीभुत लागल्याचे मोठे समाधान झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)